कोरेगाव तालुक्यातील नागझरी या गावचे सुपुत्र कृष्णा विठ्ठल भोसले यांनी मायानगरी ठाण्यात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. उद्योजक आणि आदर्श व्यवसायिक म्हणून ठाण्यात केलेली ओळखच आजपर्यंत पडद्याआड होती. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ठाण्यात महाराष्ट्र शासनाचा जिल्हा उद्योजक या पुरस्काराने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
त्यांना पुरस्काराने गौरव केल्याबद्दल नागझरी या गावामध्येही त्यांचे कौतुक केले जात आहे.
मुंबई, ठाणे, पुणे या मेट्रो सिटीमध्ये गावाकडून जावून तेथे उद्योजक बनने खूपच अवघड असते. व्यवसायात कित्येक अडचणी येत असतात. साताऱयाच्या छोटय़ाश्या नागझरी या खेडय़ातुन ठाणे येथे सुरुवातीला कामानिमित्ताने गेलेले परंतु पुन्हा उद्योजक झालेले कृष्णा विठ्ठल भोसले यांची ठाणे जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. त्यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा उद्योजक हा पुरस्कार जाहीर झाला अन् तो पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच म्हणजे सातारा जिह्याच्या सुपूत्राच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फन्साळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार म्हणजे नागझरी गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा ठरला आहे.
नागझरी गावातील पाणी फाऊंडेशनच्या कामात सुद्धा कृष्णा भोसले यांनी पडद्यामागून मोठी भूमिका बजावली होती. ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, सातारा याठिकाणी त्यांनी आपल्या उद्योगाची भरभराट केली आहे. परंतु तरीही साधी राहणी, शांत स्वभाव, चोख व्यवहार, व्यवसायातील अफाट ज्ञान, जाहिराती पासून दूर, मनमिळाऊ स्वभावामुळे शासनाने त्यांच्या कामाची दखल घेवून पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार त्यांनी आपल्या आईवडिलांच्या व कुटुंबासोबत स्विकारला.