सातारा नगरपरिषदेत सध्या माहिती अधिकार कायद्याचा (RTI) गैरवापर होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विविध अर्जांद्वारे वारंवार माहिती मागवणारे काही तथाकथित “डुप्लिकेट माहिती अधिकार कार्यकर्ते” सक्रिय झाल्याने प्रशासकीय कामकाजावर अतिरिक्त ताण येत असल्याचे चित्र दिसत आहे.
नगरपरिषदेत दररोज येणाऱ्या अर्जांची संख्या वाढत असून, काही व्यक्ती एकाच प्रकारच्या माहितीकरिता वेगवेगळ्या नावांनी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज दाखल करत असल्याची चर्चा अधिकारी वर्गात सुरू आहे. यामुळे मूळ माहिती अधिकार कायद्याच्या हेतूलाच बाधा निर्माण होत असल्याचे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे अर्ज केवळ माहिती मिळवण्यासाठी नसून त्यामागे वैयक्तिक हेतू किंवा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण होत असून, नियमित प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करणे कठीण होत असल्याचे सांगितले जाते.
अर्ज सादर केल्यानंतर काही जण “हरी ओम”, “श्री दत्त दिगंबर” अशा विविध पद्धतीने स्वतःची ओळख बदलत असल्याच्या चर्चाही परिसरात रंगल्या आहेत. त्यामुळे अधिकारी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सातारा नगरपरिषदेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली असून, माहिती अधिकार कायद्याचा योग्य वापर व्हावा आणि त्याचा गैरवापर थांबवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लवकरच अर्जांची पडताळणी, पुनरावलोकन तसेच प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काही अंतर्गत नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगरपरिषद परिसरात मात्र या “डुप्लिकेट माहिती अधिकार अर्जांच्या सुळसुळाटाची” जोरदार चर्चा सुरू असून, पुढील काळात प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Home Latest News Politics|Satara District सातारा नगरपरिषदेत ‘डुप्लिकेट माहिती अधिकार कार्यकर्ते’ सक्रिय






