सातारा पालिकेचे कामकाज कडकडीत बंद चर्चेनंतर वारसा हक्काच्या चोवीस जागा भरण्याचा निर्णय

121
Adv

सातारा नगरपालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सातारा पालिकेचे कामकाज दुसऱ्या दिवशीही बंद राहिले .आंदोलकांनी पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराचा मार्ग अडवल्याने पालिकेत सर्व केबिन मंगळवारी दिवसभर कुलूपबंद राहिली . वसुली,दाखले वाटप , तसेच सफाई कामे सर्वच व्यवस्था ठप्प झाल्याने प्रशासनासह नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत .

मंगळवारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. पालिकेचे नवीन प्रवेशद्वार कुलूपबंद ठेऊन जुन्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी ठिय्या देऊन अधिकारी व पदाधिकारी यांचा मार्ग रोखला . पालिकेत कामासाठी आलेल्या नागरिकांना हात हालवत परत जावे लागले . काही भागातील पाणी टंचाईचे निरोप पाणी पुरवठा विभागाला न पोहोचल्याने टॅंकर वितरणाचा घोटाळा झाला . कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी प्रशासन वेठीला धरल्याने पालिकेचे बावीस विभाग कुलूपबंद राहून कोणतेही कामकाज होऊ शकले नाही . अधिकारी तत्सम कर्मचाऱ्यांना आंदोलकांनी पालिका इमारतीच्या बाहेर पिटाळले . स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अहवाल नोंदीची प्रक्रिया सुध्दा लटकली .

सातारा पालिका कामगार युनियन व प्रशासन यांच्यात दिवसभर कोणतीही चर्चा झाली नाही . नागरीकर्मचार्‍यांनी नगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवले तर मागील बाजूच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. अधिकार्‍यांना आज जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने दिवसभर कामकाज बंद होते. यामुळे पालिकेत दिवसभर शांतता होती.
सातव्या वेतन आयोगाचा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना फरकाचा लाभ देणे, करंजे येथील मंजूर दोन हेक्टर जागा चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना घरांसाठी देणे, एक तारखेला नियमित पगार करणे, कर्मचार्‍यांना गणवेश व एक हजार रुपये धुलाई भत्ता, 2000 ते 2005 या दरम्यान जी भरती झाली नाही त्यांची त्वरित भरती करणे, ठेका पद्धत बंद करून रोजंदारीवर कर्मचारी नेमणे आदी मागण्यांसाठी कालपासून कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. काल केवळ नगराध्यक्षांशी तोंडी चर्चा झाली. मात्र, ठोस कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे कर्मचार्‍यांनी आज आंदोलन आणखी तीव्र केले.

सकाळी नगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वारचे शटर खाली ओढून बंद केले. त्यानंतर सर्व कर्मचारी केसरपेठेकडील प्रवेशद्वारावर ठिय्या देवून बसले. पायर्‍यांवरही खुर्च्या आडव्या लावून मार्ग बंद केला. आत येणार्‍या अधिकार्‍यांनाही त्यांनी विरोध केल्यामुळे कुणीही अधिकारी पालिकेत आला नाही. परिणामी, सर्व सभापतींची दालने आणि अधिकार्‍यांची कार्यालये कुलूपबंद अवस्थेत होती. सायंकाळी उशिरा पालिका कर्मचारी युनियन चे अध्यक्ष श्रीरंग घाडगे , मुख्याधिकारी शंकर गोरे, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी उपनगराध्यक्ष अॅड दत्ता बनकर यांच्यात सविस्तर चर्चा झाली . डीएमएच्या सूचनेनुसार लाड – पागे समितीच्या सूचनेनुसार वारसा हक्काच्या चोवीस जागा तत्काळ भरणे, व माजगावकर माळ येथे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वसाहती करिता जागेची मोजणी करणे यांचा अंतिम आराखडा येत्या शनिवारी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला . त्यामुळे कामगार संघटनेने संप उशिरा मागे घेतला .

Adv