आरोग्य अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे बांधकाम विभागाने बांधलेला रॅमप झाला नागमोडी

52
Adv

स्वच्छ सर्वेक्षण समिती पाहणी करण्यास येणार असल्याने सातारा पालिकेने स्वच्छतागृहांमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प घाईघाईने बसवले आहेत. यामुळे एकेक रॅम्प तर ‘अ‍ॅन्टिक’च बनला आहे. त्यावरून जाताना धडधाकट माणूसही घसरून आपटेल, तेथे दिव्यांगांची काय कथा? अशा पद्धतीने बांधलेला रॅम्प म्हणजे दिव्यांगांची कुचेष्टा असून, त्याचा उपयोग शून्य होणार आहे.

स्वच्छता सर्वेक्षणमध्ये अव्वल येण्यासाठी सातारा नगरपालिकेने कंबर कसली आहे. मात्र, पाहणी करण्यासाठी स्वच्छता सर्वेक्षण पथक येणार असल्याने पालिकेला केवळ दिखावा करण्यासाठी अनेक ‘सेट’ उभारावे लागल्याचे दिसत आहे. त्यातील बोगदा परिसरातील स्वच्छतागृहात बांधलेले दिव्यांगांचे रॅम्प तर असे ‘अ‍ॅन्टिक’ बनले आहेत की, ज्यांची ‘तुलना’च होऊ शकत नाही. हे रॅम्प पाहणारे नागरिकही अवाक् होत आहेत. यातील एक रॅम्प तर असा बनवला आहे की जेथे रॅम्प संपतो, तेथून स्वच्छतागृहाच्या पायरीवर उडी मारूनच गेले पाहिजे व उतरतानाही त्याच पद्धतीने यावे लागणार आहे. अशा पद्धतीने जवळपास सरळसोट बनवलेली रॅम्प दिव्यांगांची खिल्ली उडवण्यासाठीच बनवली गेली काय?, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

रॅम्प फक्त दिखावापुरता नसावा तर त्याचा शौचविधी करण्यासाठी येणार्‍या दिव्यांग बांधवांना वापर करता यावा, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी अनेक कार्यालये व इतर सार्वजनिक ठिकाणी रॅम्प नसल्यामुळे दिव्यांगांची कुचंबणा होत असे. मात्र, आता रॅम्प बनवले जात आहेत, ही चांगली बाब आहे. मात्र, ते बनवताना या रॅम्पचा योग्य वापर होईल, असेही संबंधित बांधकाम ठेकेदाराने बघितले पाहिजे. दिव्यांगांसाठी रॅम्प बनवण्यासाठीही एक नियमावली आहे. त्या नियमांना धाब्यावर बसवल्यास हे रॅम्प केवळ शो-पीस बनणार आहेत.

केवळ शो-पीस बांधून स्वच्छता सर्वेक्षणमध्ये मार्क मिळवण्यापेक्षा या सुविधांचा नागरिकांना उपयोग झाल्यास ते खरोखरच धन्यवाद देतील. यामुळे नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने ज्या-ज्या ठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प बांधली आहेत, त्याची पाहणी करून जी कुचकामी ठरत आहेत, ती नव्याने बांधून घेण्याची गरज आहे.

योग्य प्रमाणात असावा रॅम्पचा उतार
रॅम्प बांधताना जागेची उपलब्धता पाहून त्यानुसार बांधकाम ठेकेदार उतार ठेवतो. तथापि, योग्य कोनात रॅम्प बांधणे अपेक्षित आहे. जास्त उतार असल्यास तेथून चढून जाणे व उतरणे सुलभ होणार नाही. मात्र, येथे जागा उपलब्ध असतानाही रॅम्पचा तीव्र उतार असल्याने याचा वापर करणे दिव्यांग बांधवांना जिकिरीचे ठरणार आहे.

Adv