देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विद्यमान सरकारचा कार्यकाळ आज संपत आहे, आणि नवीन सरकार सत्तेवर आलेले नाही. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा दिला. परंतु काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी माझ्याकडे जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पुढील व्यवस्था म्हणून मी काम पाहणार असल्याचे फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
उद्धव ठाकरे व आमच्यामध्ये अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली नव्हती. अमित शाह यांच्यासोबतही अशी चर्चा झालेली नव्हती. शिवसेनेने आमच्यासोबत चर्चेची सगळी दारे बंद केली आहेत. पण काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत मात्र चर्चा केली जात आहे. शिवसेनेचे नेते भाजपवर व नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जावून टीका करीत आहेत. सत्तेत राहूनही आमच्यावर टीका केली जात असल्याचीही नाराजी फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता केली. येत्या काळात भाजपच्या नेतृत्वाखालीलच सरकार स्थापन होईल, असा दावाही फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत काय म्हणाले ?
गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने भरपूर कामे केली. मोठ मोठे प्रकल्प मार्गी लावले. शहर, गाव, प्रत्येक ठिकाणी विकास झाला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात प्रचंड काम झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेत आम्हाला प्रचंड बहुमत दिले. विधानसभेत देखील महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो. आम्हाला (महायुती) बहुमत मिळालं. आम्हाला 160 जागा मिळाल्या. 105 जागा घेऊन भाजप निवडून आला. हा विजय या करिता मोठा आहे, कारण 70 टक्के जागा लढलेल्यांपैकी आम्हाला मिळाल्या. कामाची पावती जनतेने आम्हाला दिले.
दुर्दैवाने, अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. पण शिवसेना पक्षप्रमुख यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. सरकार बनविण्याचे आमचे मार्ग खुले आहेत,
आज मी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. पण वैकल्पिक व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे. दैनंदिन कामाकरीता मी मुख्यमंत्रीपदी राहणार आहे. कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय आम्हाला घेता येणार नाही