सातारा जिल्ह्याची शांततेची परंपरा कायम ठेवा ; जनतेला आवाहन

102
Adv

सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आहे. काही झाले आले तरी   जिल्ह्यातील शांतता कधी भंग झालेली नाही. हीच परंपरा पुढे चालू ठेवून जिल्ह्यात शांतता राखा, असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज केले.

येथील पोलीस करमणूक केंद्र (अलंकार हॉल) मध्ये आज शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, सहायक पोलीस अधिक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

प्रत्येकावर विश्वास असल्याने आपला समाज हा एकमेकांवर अवलंबून आहे. लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्याची शांततेची परंपरा आहे ती कायम ठेवा , असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी या बैठकीत केले.
सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याने कधीही चुकीच्या वृत्तीला थारा दिलेला नाही. प्रत्येक गावातील प्रमुखांनी आपल्या गावात शांतता ठेवण्याबाबत आवाहन करुन जिल्ह्याच्या एकीचे दर्शन दाखवा, असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या बैठकीत केले.
सातारा जिल्हा नेहमी शांतता प्रिय राहिला आहे, ही शांतता कायम ठेवा, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, समाज माध्यमात  समाजात कुठल्याही प्रकारचा तेढ निर्माण होईल, असे मजकुर टाकू नये, चूकीचे संदेश असे टाकल्यास ग्रुप ॲडमीवर कारवाई होवू शकते. आपल्या जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा असून ती परंपरा कायम ठेवा समाजामध्ये कोणी तेढ निर्माण करत असेल तर त्याची माहिती प्रशासनाला देवून सहकार्य करा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या शांतता कमिटीच्या  बैठकीत केले.
धार्मिक तेढ निर्माण होणार नाही असे मजकुर समाज माध्यमांवर टाकणे हा गुन्हा, असे कोणी मजकुर टाकत असले तर त्याची माहिती तात्काळ  जवळच्या पोलीस स्टेशनला द्या.  धार्मिक भावना दुखावणारे, तेढ निर्माण करणारे कोणतेही कृत्य करु नये. आजच्या शांतता बैठकीतील सूचना नागरिकांपर्यंत पोहचवा. कायदा व सुव्यवस्थेचा कोठेही प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस विभाग दक्ष असून समाजात शांतता राहण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहाकर्य करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी या बैठकीत केले.
आज झालेल्या शांतता कमिटीच्या  बैठकीला विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Adv