Thursday, May 21, 2026
spot_img
Home Maharashtra जिल्हा बँकेच्या भरतीला दिलेली स्थगिती उठवा

जिल्हा बँकेच्या भरतीला दिलेली स्थगिती उठवा

6
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरतीला शासनाने स्थगिती दिली असून ही स्थगिती लवकर उठवावी अशी मागणी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपचे साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेवर आलेल्या स्थगितीमुळे आज अनेक पात्र युवक- युवतींची स्वप्ने अधांतरी राहिली आहेत. अनेक वर्षें कठोर परिश्रम, अभ्यास, आर्थिक अडचणी आणि कुटुंबाच्या अपेक्षा यांचा सामना करत उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी झाले. दिवस-रात्र मेहनत करून परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला होता. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व गरीब कुटुंबातील अनेक युवक या भरतीवर आपल्या संपूर्ण भविष्याचा आधार ठेवून आहेत. काही उमेदवारांच्या घरातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. उमेदवारांच्या घरावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे तर काही जणांच्या विवाहाचे निर्णयही या नोकरीवर अवलंबून आहेत. अनेक कुटुंबांनी “आता मुलाला नोकरी लागली” या आशेवर पुढील आयुष्याची स्वप्ने रंगवली होती.

परंतु, अचानक आलेल्या स्थगितीमुळे हजारो कुटुंबांमध्ये निराशा आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक उमेदवार मानसिक तणावाखाली असून, “आता पुढे काय” हा प्रश्न त्यांना सतावत आहे. एका नोकरीसाठी युवक किती संघर्ष करतो हे आपण जाणता वर्षानुवषे अभ्यास, स्पर्धा परीक्षा, घरची आर्थिक अडचण आणि समाजातील अपेक्षा यासगळ्यांशी झुंज देत उमेदवारांनी हा टप्पा गाठला आहे.

तरी ही भरती हजारो युवकांच्या आयुष्याचा, त्यांच्या आई-वडिलांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याचा प्रश्न आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे.शासनाने युवकांच्या भावना समजून घेऊन भरती प्रक्रिया पुर्ण झालेली असल्याने या भरतीवरील स्थगिती तात्काळ उठवावी व नियुक्ती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खासदार महोदयांनी केली

Adv