सातारा–सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी मिळविलेल्या विजयाने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यात झालेल्या रणनीतीपूर्ण नियोजनाची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधान परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची मानली जात होती. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. नगरसेवक, नगरसेविका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही बाजूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र अंतिम निकालात धैर्यशील कदम यांनी विजय मिळवत महायुतीची ताकद सिद्ध केली.
या विजयामुळे सातारा जिल्ह्याला धैर्यशील कदम यांच्या रूपाने आणखी एक आमदार मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये भाजप आणि महायुतीचे वजन वाढले असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते मतदान आणि निकालापर्यंत खासदार छ उदयनराजे भोसले यांनी अनेक राजकीय हालचाली केल्याची चर्चा होती. त्याचेच फलित या विजयातून दिसून आल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
सातारा जिल्ह्यात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा प्रभाव कायम राहिला असला तरी या निवडणुकीने त्यांचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. जिल्ह्यातील अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्र ठेवण्यात त्यांनी यश मिळविल्याचे बोलले जात आहे.
धैर्यशील कदम यांच्या विजयामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. निकालाच्या आधीच विजयाचे बॅनर झळकू लागल्याने महायुतीच्या आत्मविश्वासाचीही चर्चा रंगली होती.
सातारा–सांगली विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा केवळ एका उमेदवाराचा विजय नाही, तर सातारा जिल्ह्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे राजकीय वजन आजही कायम असल्याचा संदेश देणारा निकाल मानला जात आहे. धैर्यशील कदम यांच्या विजयाने महायुतीची रणनीती यशस्वी ठरली असून साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजेंची ‘हाय कमांड’ पुन्हा एकदा प्रभावी ठरल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यात झालेल्या बैठकीत आखण्यात आलेली रणनीती प्रत्यक्ष मतदानात प्रभावी ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले. स्थानिक पातळीवरील नियोजन, मतदारांशी सातत्याने संपर्क आणि महायुतीतील समन्वय यामुळे धैर्यशील कदम यांना विजयाची मोठी आघाडी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
धैर्यशील कदम यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळाला असून जिल्ह्याच्या विकासासाठी विधान परिषदेत प्रभावी आवाज निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये या विजयामुळे उत्साहाचे वातावरण असून जिल्हाभर जल्लोष साजरा होत आहे






