स्वच्छ सातारा, सुंदर सातारा” ही घोषणा केवळ फलकांपुरतीच मर्यादित राहिली आहे का, असा प्रश्न वॉर्ड क्रमांक २२ मधील नागरिक विचारत आहेत.
वॉर्डाची सुरुवात ज्या चौकापासून होते, त्याच ठिकाणाहून दररोज तीन शाळा, एक बालक मंदिर आणि एका महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच पालकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना अक्षरशः नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. उपरोधिक भाषेत “सुगंधी द्रव्याचा फवारा” येथे मारला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
याच ठिकाणी समोरील पार्किंगच्या जागेत नाल्याच्या कामासाठी आणलेले दोन मोठे पाईप बेफिकीरपणे टाकून ठेवण्यात आले आहेत. या पाईपला धडकून दोन महिला दुचाकीसह पडल्याची घटना घडली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
प्रश्न असा आहे की, एखादा गंभीर अपघात होऊन मोठे नुकसान झाल्यानंतरच संबंधित प्रशासन आणि जबाबदार यंत्रणा जागी होणार का? शालेय विद्यार्थी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक याच मार्गाचा वापर करत असल्याने तातडीने या धोकादायक पाईपची व्यवस्था करणे आणि परिसराची स्वच्छता करणे आवश्यक आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही स्थानिक पुढाऱ्यांच्या संबंधामुळे अनेक जण मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा राजकीय संबंध महत्त्वाचे ठरत आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
आता प्रशासनाने त्वरित कारवाई करून परिसरातील दुर्गंधी दूर करावी, रस्त्यातील अडथळे हटवावेत आणि भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे कोणताही अपघात होणार नाही याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांचा सवाल आहे की, “आरोग्य सभापतींच्याच प्रभागात अशी अवस्था असेल, तर इतर भागांचे काय?” पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या साचलेल्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन ड्रेनेजची दुरुस्ती करावी आणि परिसराची स्वच्छता करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.






