ज्या शुक्रवार पेठेत साताऱ्याच्या मनोमिलनाची दोन सत्ता केंद्र आहेत त्याच शुक्रवार पेठेत हस्ते परहस्ते चालवल्या जाणाऱ्या टेंडर बाज संस्थांनी मूळ धरत मलिद्याचा ढेकर दयायला सुरवात केली आहे . यामध्ये पालिकेतल्या काही सरकारी बाबूंचा प्रचंड इंटरेस्ट असून अधिकाऱ्यांच्याच लॅपटॉपमध्ये टेंडर बाज संस्थांचे लेटरहेड निघू लागल्याने जाऊ तिथ खाऊंचा सरकारी कावेबाजपणा उघड होऊ लागला आहे . राजकीय वरदहस्त असणाऱ्या निविदाबहाद्दर संस्थेचे कारनामे चर्चेत येऊ लागले आहेत .
या संस्थेची नोंदणी ही कोण्या विशिष्ट नावावर असली तरी त्या मागचे राजकीय चेहरे बरेच आहेत . अधिकारी व पदाधिकारी यांनीच संगनमताने गरूड झेप ला पालिकेत बळं दिल्याने खाऊगिरीची बाबूगिरी प्रकर्षाने चव्हाट्यावर आली आहे . या संस्थेचा प्रोप्रायटर नक्की कोणी नसून नगरसेवक व अधिकारीच पडदया आडून ही संस्था ऑपरेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे . संस्थेचा पत्ताही शुक्रवार पेठेतला असल्याने त्या आडून टेंडर गिरी करणारे सुध्दा साताऱ्याच्या राजकीय प्रभाव क्षेत्रात असल्याचा साक्षात्कार सातारकरांना झाला .
एका मजूर सेवा सोसायटीचे चे काही महत्वाचे दस्तऐवज हे थेट पालिकेच्या परिवहन विभागाच्या काही टेबलमध्ये व काही लॅपटॉपमध्ये आढळल्याने या गरूड झेप ला राजकीय वरदहस्त मोठा असल्याचे स्पष्ट झाले आहे . या बनवाबनवी चा फार्स सर्वसाधारण सभेत रंगता रंगता राहून गेला . त्यावर सारवासारवी करताना पालिका कर्मचाऱ्यांची जी भंबेरी उडाली त्यावरूनच कुठे पाणी मुरतयं याचा सातारकरांना पक्का अंदाज आला होता . आधी छोटे मोठे पॅचिंग करणाऱ्या या संस्थेला नंतर पुतळ्यांची स्वच्छता नंतर शिक्षण मंडळाचा कंत्राटी तत्वावर शिक्षक पुरवणे , अशी असंख्य कामे मिळाली, ही उदाहरणे वानगीदाखल आहेत . परवडत नाही म्हणून मी काम करणार नाही असं संबधित ठेकेदाराने कळवून सुद्धा त्याला नोटीस किंवा काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया न करता त्यालाच गळ घालायचे प्रेमळ उदयोग सरकारी बाबूंचे उदयोग सुरू आहेत . आधी ही संस्था एका माजी उपनगराध्यक्षाने ऑपरेट केली आता याचे कुळ कोणाकडे आहे ? हे गुलदस्यात आहे . या टेंडर बाज फर्मचा चा खजिना विभागात भयंकर व ट आहे त्याच्या बिलांना तगडी राजकीय शिफारस असल्याने काम नसूनही बिले बिनबोभाट व त्यानंतरच्या टक्केवारीचे रितसर वाटप होत असल्याने खाउ गिरिची झेप पालिकेत बरीच वाढली आहे . संबधित संस्थेच्या कारनाम्याचा नकळतपणे शोध लागला . संस्थेची लेटरहेड व त्यावर संबधित संचालकांच्या सही चा नमुना या गोष्टी परिवहन विभागाच्या लॅपटॉपमध्ये प्रकट झाल्या .परिवहन विभागात कंत्राटी तत्वावर पंधरा चालक भरले जाणार होते मात्र पालिकेत त्यावर जोरदार राजकीय घमासान झाल्याने सारेच प्रकरण बारगळले . या विषयावर टीकेची झोड उठवणाऱ्या सत्ताधारी नगरसेवकांना सभेत याचे काहीच उत्तर मिळाले नाही मात्र खाजगीमध्ये माफी मागून प्रकरणं मिटवण्यात आले .
चौकट- ,
स्वच्छ भारत अभियान स्पर्धा करिता सातारा पालिका जोरदार तयारी करत आहे . सोनगाव कचरा डेपोच्या अंर्तगत भागात आणखी एक भिंत बांधण्याचे काम याच टेंडर बाज संस्थेला देण्याचा खटाटोप करण्यात आला आहे . स्वच्छ भारत मध्ये मोठी कामगिरी करण्याचा ‘ विशाल ‘ हेतू लक्षात घेऊन आरोग्य सभापती यामध्ये सक्रीय झाल्याची वदंता आहे . उपमुख्याधिकारी संचित धुमाळ या विभागाचे प्रमुख आहेत . त्यांना पुढे करून आतल्या बाजूने अच्छे दिनाची वाहती गंगा वाहती ठेवायची हाच अजेंडा राबवला जात आहे . धुमाळांनी हे राजकीय संदर्भ जाणीवपूर्वक तपासायला हवेत .