त्वरीत महामार्ग दुरुस्ती करा, अन्यथा टोलनाका बंद करा आ. शिवेंद्रसिंहराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

109
Adv

सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे चाळण झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल वसुली नेमकी कशासाठी आहे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत ठेकेदार यांना या समस्येचे काहीही देणेघेणे नाही. वारंवार निवेदने देवून आणि चर्चा करुनही प्रश्‍न सुटत नसल्याने जनता त्रस्त झाली आहे. त्वरीत सातारा- पुणे महामार्गाची दुरुस्ती करावी तसेच टोल नाक्यावर आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात अन्यथा टोलनाका बंद करा, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. दरम्यान, या ज्वलंत प्रश्‍नासंदर्भात लवकरच आपण बैठक घेवू आणि प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन ना. ठाकरे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले.

महामार्गावरील जीवघेणा प्रवास आणि सक्तीची टोल वसुली याविरोधात सातारी जनता पेटून उठली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनीही आक्रमकपणे या प्रश्‍नाविरोधात सातत्याने आवाज उठवला असून उद्या (बुधवारी) आनेवाडी टोलनाका बंद करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, हा प्रश्‍न काहीही करुन तडीस नेण्यासाठी आग्रही असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरपूर येथे अधिवेशनादरम्यान मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री ना. ठाकरे यांची भेट घेवून त्यांना महामार्ग दुरुस्ती, टोल नाक्यावरील आवश्यक सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवणे याबाबत चर्चा केली. तसेच संबंधीत प्राधिकरणास हे जमत नसेल तर टोलनाका बंद करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाची दरवर्षी खड्डयांमुळे चाळण झालेली असते. मोठमोठ्या खडड्यांमुळे दररोज छोटे- मोठे अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो तर, अनेक जण कायमचे जायबंदी होत आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ सुरु असून जीवीत व वित्त हानी होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण डोळ्यावर पट्टी बांधुन बघ्याची भुमिका घेत आहे. प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदारास तर लोकांच्या जीवाचे काहीही देणेघेणे राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दळणवळणासाठी दर्जेदार महामार्ग असावा, वाहनचालक आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी टोलवसुली आहे, का ठेकेदाराचे इमले उभे करण्यासाठी टोल वसुली आहे, हेच कळेनासे झाले आहे. सातारा- पुणे महामार्गावर सातत्याने खड्डे पडत आहेत. जनतेमधुन संतापाची लाट उभी राहिली आहे.
आनेवाडी व परिसरातील गावकर्‍यांसह महामार्गालगत असलेल्या सातारा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी गेल्या आहेत. असे असताना आनेवाडी टोल बुथवर स्थानिक भुमिपुत्रांनाही टोलसाठी अरेरावी आणि दमदाटीचे प्रकार सुरु असतात. सातारा शहर आणि सातारा व जावली तालुक्यातील नजीकच्या गावांमधील लोकांना कामानिमीत्त, समारंभानिमीत्त भुईंज, पाचवड, वाई, जोशी विहीर, सुरुर आदी ठिकाणी सातत्याने ये-जा करावी लागते. त्यांनाही टोल द्यावा लागतो. भुमिपुत्रांच्या जमिनी घेवून त्यांच्याकडूनही सक्तीने टोलवसुली केली जाते. ही बाब अन्यायकारक आहे. त्यामुळे ज्या कारणांसाठी टोलवसुली केली जाते, त्यातील महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी. तसेच महामार्गावर सोयी सुविधा पुरवाव्यात अन्यथा टोलनाका बंद करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सविस्तर चर्चेअंती प्रश्‍नाचे गांभिर्य ओळखुन मुख्यमंत्री ना. ठाकरे यांनी लवकरच यासंदभांत बैठक बोलावू आणि प्रश्‍न सोडवू असे आश्‍वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले आहे.

Adv