जिल्हा नियोजन समितीच्या ‘आयपास’ प्रणालीद्वारे जिल्हा वार्षिक योजनांचे कागदरहीत कामकाज होऊन प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक मागवणे, प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाबरोबरच मंजूर कामावर पारदर्शकपणे संनियंत्रण राहील. योजनांची उत्कृष्टपणे व गतीने अंमलबजावणी होऊ शकेल, असा विश्वास प्रभारी जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा जिल्हा नियोजन समिती कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनांची प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच सर्व दस्तावेज संगणकीकृत करून कागदरहीत कामकाज करण्यासाठी ‘आयपास’ या वेब बेस्ड संगणकीय प्रणाली उद्घाटन व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय धोत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धमेंद्र काळोखे, कोरेगाव प्रांताधिकारी किर्ती नलावडे, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे यांच्यासह अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुरवातीला जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे यांनी यावेळी आयपास संगणकीय प्रणालीविषयीच्या कार्यपध्दतीविषयी सविस्तर पायाभूत माहिती उपस्थितांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिंदे म्हणाले, जिल्हा नियोजन समितीकडून संनियंत्रित योजनांची अद्ययावत माहिती एकत्रितरित्या राज्यस्तरावर उपलब्ध होणार आहे. प्रस्तावित कामाचे अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता मागवणे, त्याची तपासणी करुन त्यास प्रशासकीय मान्यता देणे, निधी वितरण करणे, मंजूर करण्यात आलेल्या कामांचे जिल्हास्तरीय पोर्टल व मोबाईल ॲपद्वारे निरीक्षण सोपे होणार आहे. यासाठी योजनांची अंमलबजावणी करणा-या सर्व अधिका-यांनी आयपास प्रणालीची माहिती करुन घेऊन जिल्हा नियोजन कार्यालयाच्या सूचनेप्रमाणेच या प्रणालीत कामे करावीत, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमास सर्व योजनांच्या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे प्रमुख व काम पाहणारे लिपीक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Satara District आयपास’प्रणालीमुळे जिल्हा वार्षिक योजनांची अंमलबजावणी गतीने होऊ शकेल -रामचंद्र शिंदे