सरसकट कर्जमाफी आणि युध्दपातळीवर नुकसानभरपाई द्या सातारा जिल्हा काँग्रेसची मागणी*

84
Adv

अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने जिल्हयातील शेतक-यांना दिलासा मिळावा, त्यांना सरसकट कर्जमाफी आणि तातडीची नुकसानभरपाई मिळावी आदी मागण्यांसाठी सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आज राज्यपालांना जिल्हाधिका-यांमार्फत निवेदन देण्यात आले.

गेल्या शतकात प्रथमच एवढया मोठया प्रमाणात सातारा जिल्हयात पाऊस झाला. नोव्हेंबर महिना सुरु असतानाही अजूनही जागोजागी पाऊस पडतो आहे, त्यामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतक-याला या अतिपावसाने महापुराला सामोरे जावे लागले तर परतीच्या अवकाळी पावसाने त्याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घासही हिरावला गेला, त्यामुळे तो पुरता नागवला गेला आहे, अशा परिस्थितीत लोकशाही कल्याणकारी राज्यात संबंधितांना युध्दपातळीवर मदत मिळणे गरजेचे आहे. ती मदत देताना तांत्रिक कारणांचा बाऊ न करता नुकसानभरपाई आणि कर्जमाफी सरसकट व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांमार्फत राज्यपालांना केली आहे. या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या अशा,

1. सातारा जिल्हयातील सर्व शेतक-यांना सरसरकट कर्जमाफी मिळावी.

2. जिल्हयातील पाटण व कराड तालुक्यात महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी व इतर सर्व आपद्ग्रस्त कुटुंबांना शासनाने घोषित केलेली मदत तातडीने मिळावी.

3. वाई, खंडाळा, जावली, सातारा आदी तालुक्यातील पश्चिम-डोंगरी भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. बांध-बंदिस्ती-ताली वाहून गेल्यामुळे मातीची मोठया प्रमाणात धूप झाली आहे. या नुकसानीतून सावरताना संबंधितांना बराच कालावधी लागणार आहे. या सर्व शेतक-यांना युध्दपातळीवर मदत करणे गरजेचे आहे.

4. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे शासन यंत्रणेला करता आले नाहीत, त्यामुळे नजरपाहणीव्दारे नुकसान मान्य करुन प्रत्यक्ष पंचनाम्याची अट शिथील करण्यात यावी.

5. अतिवृष्टी व अवकाळी पाऊस संपूर्ण जिल्हयात झाला असून जिल्हयातील सर्व शेतक-यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी.

6. प्रतिहेक्टरी 1 लाख रुपये असे नुकसानभरपाईचे स्वरुप असावे व ते प्रत्येक शेतक-यांपर्यंत पोहच केले जावे.

7. विहिरीवरींल वीजपंपाचे बील तसेच उपसा सिंचन योजनांची वीजबिले माफ करण्यात यावीत.

8. पीक विमा कंपन्यांनी सर्व शेतक-यांना सरसरकट विमा रक्कम मंजूर करावी. ही रक्कम तातडीने देण्याबाबत विमा कंपन्यांना आदेश निर्गमित व्हावेत.

दरम्यान, या मागण्यांचा गांभीर्याने विचार होऊन त्याची युध्दपातळीवर अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.

शिष्टमंडळात बाबासाहेब कदम, अॅड. बाळासाहेब बागवान, अॅड. विजयराव कणसे,रजनी पवार,धनश्री महाडिक, राजेंद्र शेलार,बाबुराव शिंदे,अन्वर पाशाखान,मनोज तपासे, नरेश देसाई, अॅड. दत्तात्रय धनावडे,सुषमा राजेघोरपडे,शरद मोरे,मालन परळकर,रोहिणी आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता

Adv