उत्तर कोरेगावमधील सोनके ते करंजखोप या रस्त्यावर आठ महिन्यांपूर्वी 29 लाख रुपये खर्च करून पुलाचे काम करण्यात आले मात्र आठ महिन्यातच या पुलाला भगदाड पडण्याची चिन्हे आहेत.निकृष्ट काम झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून या कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.
सोनके ते करंजखोप रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून पूल धोकादायक बनला होता. ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करून लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्याकडे मागणी केल्यानंतर मोठ्या संघर्षातून 29 लाख रुपये पुलाच्या बांधकामासाठी मंजूर झाले होते. या पुलाचे काम त्याच भागातील एका ठेकेदाराने मिळवले होते. या पुलाचे काम सुरू असताना ग्रामस्थांनी निकृष्ट कामाबाबत आवाज उठवला होता मात्र प्रशासनाने याबाबत दुर्लक्ष केले होते. याठिकाणी वापरण्यात येणारे साहित्य हलक्या दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र संबंधित ठेकेदार काहींच्या मर्जीतील असल्याने याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
सोनके -करंजखोप रस्त्याची दुरावस्था ही नित्याचीच बाब होती.पुलाचे बांधकाम झाल्याने काही अंशी वाहतूक सुरळीत झाली होती मात्र महिन्यातच या परिसरातील नागरिकांचा भ्रमनिरास होताना दिसत आहे.
पुलावरील खडी, डांबर निघण्यास सुरुवात झाली आहे. पुलावरून पाणी वाढल्याने अनेक ठिकाणी पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे पुल खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. 29 लाख रुपये खर्चून आठ महिन्यात पूल धोकादायक बनला असल्याने बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या संगनमताचा पर्दाफाश झाल्याचे बोलले जात आहे .कामाचे टेंडर देताना देखभाल दुरुस्तीची अट असल्याने संबंधित ठेकेदाराकडून या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.