सातारा / प्रतिनिधी
शेंदूरजणे, (ता. वाई) येथील वीरमाता श्रीमती व्दारका बाबर यांना कृषी प्रयोजनासाठी दिलेली जमीनचा आदेश वाटप अटी, शर्तीचा भंग केला होता. या जागेवर गावातील युवक हे शारिरीक व्यायाम, खेळ, भरतीपूर्व शारीरिक तयारीसाठी वापर करत होते. मात्र जागा गावाजवळील असल्याने, एका कंपनीच्या पाठीमागे असल्यामुळे कंपनीच्या विस्तारासाठी या कंपनीने प्रशासकीय लोकांना हाताशी धरून ताबा मिळवला होता, त्यामुळे विविध मागण्यांसाठी सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी वाई तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार उपोषण सुरु केल्यानंतर वाई तहसिलदारांना विविध मागण्यांबात ठोस कारवाई करण्याचे तसेच आ. मकरंद आबा पाटील यांच्याशी ग्रामस्थांच्या झालेल्या समक्ष चर्चेनुसार संबंधीत जागेबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करत असून दि. २४ जानेवारी २०२४ पर्यंत निर्णय न झाल्यास दि. २५ जानेवारी २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात, शेंदूरजणे ता. वाई जि. सातारा येथील सरकारी मुलकीपड जमीन गट नं. ११० ही वीरमाता श्रीमती द्वारका सिताराम बाबर यांना कृषी प्रयोजनासाठी प्रदान करणयात आली होती त्याबाबत अटी, शर्ती घालण्यात आल्या होत्या, या वाटप आदेशातील शर्तीप्रमाणे श्रीमती बाबर यांनी जमिनीचा वापर शेतीसाठी केला नाही. ही जमीन अद्यापही पडीक असून श्रीमती बाबर यांनी कब्जा घेतल्यापासून कधीही सदर जमिनीमध्ये शेती केलेला नाही. तसेच त्यांनी शेतजमीन न कस्ता परस्पर विक्री केली आहे. जिल्हाधिकारी अथवा शासनाची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता या मिळकतीबाबत साठेखत दस्त, कुलमुखत्यारपत्र दस्त नोंदिाले आहेत. त्यामुळे सदर वाटपाचा आदेश रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी वाई तहसील कार्यालयासमोर २२ नोव्हेंबरपासून ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणाचा इशारा श्री. सुशांत मोरे यांनी दिला होता. त्याप्रमाणे बुधवारी त्यांनी वाई तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. यावेळी तहसीलदारांशी झालेल्या चर्चेनुसार संबंधीत वीर माता यांनी जमीन विक्री, गहान, दान करू नये अशी अट असताना त्या अटीचा भंग केला आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करुन न्यायिक चौकशी करण्यात येईल. संबंधीत वीरमाता द्वारका बाबर यांनी ही जमिन विक्री झाल्यानंतर पुन्हा तहसिलदार यांच्याकडे नव्याने शेतजमीन मिळावी अशी मागणी केली आहे, तो निकाली काढण्यात येईल तसेच संबंधित जमिन गट नं. ११० ही चंद्रकांत मारुती पाटील यांना दिलेली असून ती बिनशेती करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी वाई
यांच्यकडे दाखल झाला आहे. त्यास स्थगित देण्यात येईल तसेच समस्त ग्रामस्थ, सरपंच, सदस्ययांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार आ. मकरंद आबा पाटील यांच्याशी ग्रामस्थांच्या झालेल्या समक्ष चर्चेनुसार संबंधित जागेबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल आणि लवकरच तिथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. जर याबाबत दि. २४ जानेवारी २०२४ पर्यंत निर्णय न झाला नाही तर दि. २५ नोव्हेंबर पासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही श्री. सुशांत मोरे यांनी दिला आहे.
उपोषण दरम्यान सरपंच रेखा जगताप, उप सरपंच जयसिंग जगताप, पोलिस पाटील युवराज जगताप, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, युवक उपस्थित होते. सरपंच रेखा जगताप यांचे हस्ते लिंबू पाणी घेऊन सुशांत मोरे यांनी उपोषण स्थगित केले.