स्वच्छतेच्या सप्तपदीत पाचगणी शहराला अव्वल स्थानावर ठेवणाऱ्या पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या प्रयत्नाना पुन्हा एकदा यश आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कऱ्हाडकर यांना पर्यटनस्थळ दर्जाबाबत दिलेला शब्द अखेर पूर्ण केला. महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक विभागाने विषेश बाब म्हणून पाचगणी नगरपालिकेला “ब’ गट पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. नगरपालिकेला “ब’ गटाचा दर्जा मिळाल्याने विकासास भरघोस निधी वाढणार आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार व संवेदनशील निसर्ग जतन करत इंग्रजांनी वसवलेले शहर म्हणून पाचगणी शहराचा नावलौकीक आहे. पाचगणी शहरात वर्षांला 5 ते 8 लाख पर्यटक भेट देतात. विदेशी पर्यटकाचे आवडते शैक्षणिक डेस्टिनेशन म्हणून पाचगणी शहराचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर 100 एकरांमध्ये विस्तीर्ण टेबललॅड पठार. पाचगणीतून दिसणारे कृष्णा खोरे, धोम धरण, वेण्णा नदीचे खोरे यामुळे पाचगणीच्या निसर्गसौदर्यात भर पडली आहे. पर्यटकांना पारसी पॉईट, सिडने पॉईट, स्वच्छ भारत पॉईट, हॅरिसन फॉली, भुरळ घालणारी निसर्गस्थळे पाचगणी शहराला सदैव टवटवीत ठेवतात.
उन्हाळ्यात पाचगणी शहराचे तापमान 25 ते 30 अंश सेल्यियस असते. गेल्या जानेवारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वर व पाचगणीला भेट दिली होती. शहराच्या विकासाला गती देण्याकरीता व पर्यटकांना सुविधा देण्याकरीता नगरपालिकेचा दर्जा वाढवण्याबाबत नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी पाचगणी नगरपालिकेचा दर्जा वाढवण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याकरीता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सांगितले होते. तत्कालीन मुख्याअधिकारी अमिता दगडे पाटील यांनी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव सादर केला.
राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून पाचगणीच्या पर्यटनस्थळाची क्षमता म्हणून एक विशेष बाब म्हणून पाचगणी नगरपालिकेला पर्यटन स्थळाच्या “ब’ दर्जा म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपालिकेला आता विकास निधी वाढणार आहे.