शहीद जवान नाईक संदीप सावंत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मुंढे येथे अंत्यसंस्कार

131
Adv

शहीद जवान नाईक संदीप सावंत  यांच्या पार्थिवावर आज मुंढे येथे सैन्य दलाच्या फर्स्ट मराठा लाईफ इन्फंट्री जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, कराडचे अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, उपसंचालक सैनिक कल्याण ,पुणे कर्नल आर. आर. जाधव, कमांडर स्टेशन हेडक्वार्टर,कोल्हापूर कर्नल एच. एन. जाधव यांनी शहिद जवान संदीप सावंत यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

शहीद जवान संदीप सावंत यांचे पार्थिव कराड येथील विजय चौकातून – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (दत्त चौक)-शाहू चौक-कोल्हापूर नाका-गोटे नवीन बस स्टॉप-मुंढे मराठी शाळा -मुंढे ग्रामपंचायत-चव्हाण मळा मार्गे शहीद जवान संदीप सावंत यांच्या निवासस्थानी आज आणण्यात आले. शहीद जवान सावंत यांना मानवंदना देऊन  कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या  पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात आदरांजलीचे फ्लेक्स लावले होते.  ‘ अमर रहे अमर रहे संदीप सावंत अमर रहे, भारत माता की जय,’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी  पोहचली.

यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते यांनी सावंत यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.

सैन्य दल व पोलिस दलामार्फत पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

          सैन्य दलाच्या फर्स्ट मराठा लाईफ इन्फंट्री जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली.  यानंतर पिता रघुनाथ आई अनुसया, पत्नी स्मिता , मुलगी रिया (वय २ महिने), बंधू सागर सावंत यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. शहीद संदीप सावंत  यांचे बंधू  सागर यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्रकुमार पाटील, सुभेदार चंद्रकांत पवार, सुभेदार चंद्रकांत फाटक, लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Adv