कराड नगरपरिषद मार्फत स्व.यशवंतरावजी चव्हाण स्मृतीसादन येथे महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत दिनांक ८ मे रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम लोकसहभागातून व विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला
.
कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, दाखले व इतर आवश्यक कागदपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविणे, विविध विभागांमधील समन्वय वाढविणे आणि शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत, यासाठी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले.
मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष म्हणाले,
“खर पाहायला गेले तर जे अभियान याठिकाणी पार पडत आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडतय. त्याचं नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान. आपल्याला लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार कसा असावा याचं आदर्श अस्सल उदाहरण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लाऊ नका, असं लेखी फर्मान काढणारा तो एकमेव राजा होता. आणि त्याच धर्तीवर त्याच आधारे किंवा त्याच विचारावरती आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे याठिकाणी आयोजन होते. अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी पार पाडतोय, नेमक्या महाराष्ट्र शासनाच्या योजना काय आहे आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्या योजना तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होते. हा अत्यंत कौतुकास्पद असं काम या अभियानाच्या माध्यमातून होत आहे.”
समाधान शिबिरामध्ये अतिक्रमण नियमन, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, घर तेथे शौचालय योजना, पंडित दीनदयाळ योजना तसेच विविध महसूल व नगरपालिका संबंधित योजनांचा समावेश करण्यात आला होता. नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्या तात्काळ निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही केली.
यावेळी नगरसेवक प्रवीण पवार यांनी नागरिकांना तहसील कार्यालयामार्फत शासनस्तरावरील धान्य वितरण सुविधा व इतर योजनांची माहिती दिली. “महाराजस्व अभियान” हे व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वर्षा राणी पवार यांच्याकडून करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कराड नगरपरिषदेच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमांचे आभार अमोल जाधव यांनी मानले. महाराज स्व अभियान अंतर्गत 14 स्टॉल उभारण्यात येऊन विविध योजनातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र दाखले व इतर कागदपत्रांचे वितरण ममान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
-कराड नगरपरिषद, कराड






