आखाडे सोसायटीच्या ठरावावरून सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या ठरावाच्या पार्श्वभूमीवर काही समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून, संबंधित प्रकरणाचा रोष मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे समर्थकांनी ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब यांचे कट्टर समर्थक रणजित शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
आखाडे सोसायटीच्या ठरावामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाला आता हल्ल्याच्या घटनेची जोड मिळाल्याने सातारा परिसरातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पोस्टरच्या माध्यमातून गुंडगिरी व दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आखाडे सोसायटीचा ठराव, त्यानंतर निर्माण झालेला वाद आणि रणजित शिंदे यांच्यावरील कथित हल्ल्याची घटना याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हल्ल्याच्या घटनेची अधिकृत माहिती आणि पोलिस तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांनंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
राजकीय वादाला हिंसक वळण मिळू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असून संबंधित प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






