सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर सुरू झालेला राजकीय संघर्ष आता सोशल मीडियावरही रंगू लागला आहे. ना. जयकुमार गोरे यांचे सहकारी अर्जुन काळे यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी मतदारसंघातून अपेक्षित मतदान का मिळाले नाही? याचे आधी आत्मपरीक्षण करा. दुसऱ्यांच्या माथी खापर फोडण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकेचा हिशेब घ्या, अशा शब्दांत ना. गोरे यांचे निकटवर्तीय शेखर पाटोळे यांनी ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाला लक्ष्य केले आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर महायुतीतील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ना. जयकुमार गोरे यांचे सहकारी अर्जुन काळे हे भटक्या-विमुक्त प्रवर्गातून संचालकपदासाठी निवडणूक लढवत होते. मात्र, जावळी मतदारसंघातून त्यांना अपेक्षित मतदान मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पाटोळे यांनी थेट ना. शिवेंद्रराजे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जावळी मतदारसंघातून नेमके किती मतदान झाले, याची आकडेवारी तपासावी. मतदान केंद्रांवर उपस्थित राहून कोणाला मतदान करावे, याबाबत सूचना दिल्याचे अनेक सहकारी संस्थांनी पुराव्यांसह दाखवून दिले असून, त्यासंदर्भातील व्हिडिओही उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अर्जुन काळे यांना जावळी मतदारसंघातून अपेक्षित मतदान का मिळाले नाही? याचे उत्तर आधी द्यावे. स्वतःची भूमिका झाकण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी किती खोटे बोलणार? असा सवालही पाटोळे यांनी केला आहे
.गोरे म्हणाले, आमचे महाराज भाजपशी आणि मुख्यमंत्र्यांशी कायम प्रामाणिक आहेत. त्यांनी कधीही मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर बंदूका ठेवून चालवलेल्या नाहीत. त्यांनी कधीही मुख्यमंत्र्यांचा वापर करुन स्वत:चे वजन वाढवून घेतलेले नाही. मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळून त्यांनी तुमची शक्ती वाढवलेली आहे. नाहीतर पाच वर्षापूर्वी आपल्या पक्षातले गोरे, काळे आणि निंबाळेही बॅंकेच्या संचालक मंडळात नव्हते, हे आधी लक्षात घ्या. बॅंकेच्या गेल्या निवडणुकीत आमचे महाराज तुमच्यासोबत नव्हते तेव्हा निवड़णूक का सोड़ून दिली होती तुम्ही? आमच्या महाराजांची मतांची ताकद तुमच्यासोबत नसते तेव्हा तुम्ही आणि फलटणचे तुमचे दादा शिष्य मैदान सोडतात आणि आम्ही सोबत असलो की जिंकता एवढे लक्षात घ्या. आमची मते आणि मदत घ्यायची आणि जिंकलो की मी एकट्याने विजय खेचून आणला, अशी बोंबाबोंब मारत सुटायचे हे काही बरोबर नाही.
स्वत:ची लंगोट घालून लढणारा आणि मग डोक्यावरून टाकणारा पैलवान म्हणून आमच्या महाराजांना लोक ओळखतात. सत्तेचा वापर करुन स्वत:चे साम्राज्य वाढवण्याची आमच्या महाराजांना सवय नाही. अगदी जिल्हा परिषदेचे बोलायचे झाले तर माणचेच उदाहरण घ्या. पाच जागात तीन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. एक जागा शेखरभाउंच्या मेहरबाणीवर निवडून आली आहे आणि आता तीही तुमच्या सोबत नाही. तुमच्या एका आख्ख्या तालुक्यात एक जागा तुमच्या जीवावर निवडून आली आहे. त्या एक जागेच्या आणि खटावमधील तीन जागेच्या जीवावर तुम्ही आख्खी झेडपी माझीच म्हणून सांगायला लागला आहे. फर्नच्या एसी रुममध्ये बसून फक्त झेडपीची सत्ता येत नाही. जिल्हा परिषदेत दोन हात करायला जाण्याचीही धमक ठेवावी लागते. आमच्या महाराजांनी तळ ठोकला म्हणून विरोधकांचा तळ उध्दवस्त झाला आणि भाजपची सत्ता आली. मात्र त्याचे सारे श्रेय मुख्यमंत्र्यांना आहे. आमचे महाराज फक्त मुख्यमंत्री सांगतात ते ऐकतात. मुख्यमंत्र्यांना सांगून स्वत:च्या जागा वाढवून घे, दुसऱ्याच्या ताटातलं काढून घे, असे धंदे करत नाहीत. माझे ते माझेच आणि तुझेही माझेच, असे म्हणायची सवय त्यांना नाही. ज्या शेखरभाऊने दोनवेळा त्याग करुन तुम्हाला आमदार केले, त्या शेखरभाऊलाही तुम्हाला साधा न्याय देता आला नाही. स्वत:च्या भावाला तुम्ही न्याय देवू शकला नाही आणि अख्ख्या जिल्ह्याला आणि भाजपला कुठे न्याय द्यायला चालला आहात. आधी स्वत:चा लंगोट घाला आणि कुस्त्या करा. सत्तेच्या लंगोटी घालून कुस्त्या करु नका. सत्तेचा ताम्रपट घेवून कोणीच आले नाही, हे लक्षात ठेवा. महाराजांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांना भाजप वाढवायचा आहे. कोणाचा मीपणा, गर्व आणि अहंकार वाढवायचा नाही. जिल्हा बँकेत महायुती करा. मित्रपक्षांना सोबत घेवून निवडणूक करायची आहे, हे मुख्यमंत्र्यांनी महाराजांना सांगितले होते. ते काही स्वत:च्या मर्जीने चर्चा करत नव्हते. निवडणुकीपूर्वी एकही बैठक आम्ही गोपनीय पध्दतीने गोडोलीच्या राजविलासवर जावून मकरंदआबा सोबत केली नव्हती. तुमचा टिपर धैर्यशील सतत सोबत ठेवला होता. त्याने टिपा देवूनही तुमचा कार्यक्रम नीट झाला नाही त्याला आम्ही काय करणार? ज्यांना राष्ट्रवादीने चेअरमन केले त्यांना तुम्हीही आंजरुन गोंजरुन बघितलेच होते की! तुमची विश्वासहर्ता फार मोठी असल्याने जिल्ह्याचा कोणीच तुमच्या नादाला लागत नाही एवढ तरी यातून शिका. मर्यादा ओळखून ज्याने त्याने काम करावे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात.
महाराजांच्या हक्काचे घेवून तुम्ही गमती केल्या तर तुमच्या गमती काय आम्हाला उलटवता येत नाहीत का? तुम्हालाच जमतय आणि आम्हाला जमतच नाही, असे समजू नका. मित्रपक्षांशी चर्चा करुन सर्व निर्णयाचे अधिकार महाराजांना दिले असते आणि पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही प्रामाणिक वागला असता तर आज नक्कीच भाजपचा चेअरमन झाला असता. तुम्हाला भाजपचा नाही तर तुमचा चेअरमन करायचा होता. तुम्हाला जिल्ह्याचे नेता व्हायचे आहे. तुम्ही खुशाल व्हा, त्याला आमची हरकत नाही. मात्र आमच्या महाराजांच्या नादाला लागून नाद करायचा प्रयत्न कराल तर तुमचा नाद पुराच करु एवढेच तूर्त. पुन्हा समर्थकाने फार बोलू नये, एवढी काळजी घ्या. शेवटी आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, एवढे लक्षात ठेवा..! असेही गोरे यांनी म्हटले आहे.






