सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असतानाच जावळी सोसायटी मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जावळीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जावळी सोसायटी मतदारसंघात यंदा पुन्हा माजी आमदार शशिकांत शिंदे आणि विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यात लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मागील जिल्हा बँक निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला होता. त्या निकालाची आठवण आजही जावळीच्या राजकीय चर्चेत घेतली जाते.
यंदाच्या निवडणुकीतही रांजणे पुन्हा मैदानात उतरल्याने जावळी सोसायटी मतदारसंघातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महेश शिंदे–ज्ञानदेव रांजणे भेटीचा फोटो चर्चेत आल्याने या भेटीमागे नेमका राजकीय संदेश काय, याबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. मात्र, भेटीचा राजकीय अर्थ किंवा निवडणुकीतील समीकरणांवर त्याचा परिणाम याबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
गेल्या निवडणुकीतील एका मताचा विजय, यंदाची उमेदवारी आणि जावळीतील बदलती राजकीय समीकरणे पाहता रांजणे यांच्याभोवती पुन्हा एकदा चर्चा केंद्रित होत असल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, ५ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात जावळीतील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
Home Satara District Jawali जिल्हा बँकेच्या जावळी सोसायटी मतदारसंघात पुन्हा शशिकांत शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे?






