सातारा, दि. 30, राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य होत नाही. महिलांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर म्हणणे मांडण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 5 जुलै 2023 रोजी सकाळी 10.30 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आल्याची माहिती विजय तावरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.
या जनसुनावणीस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर व विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, पुणे विभाग हे उपस्थित राहणार आहेत. जनसुनावणीमध्ये महसुल विभाग, विधी सेवा प्राधिकरणाचे विधी तज्ज्ञ, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला व मुलांचे सहाय्य कक्षाचे समुपदेशक, जिल्हा समन्वयक, पोलीस स्टेशन आवारातील महिला सहाय्य कक्ष, भरोसा सेल यांचे पॅनेल्स तयार करण्यात येणार आहे. या पॅनेलद्वारे जिल्ह्यातील प्राप्त तक्रारी, सेवाभावी संस्था समुपदेशन केंद्राकडील प्रकरणे व ऐनवेळी येणाऱ्या पीडित महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पीडित महिलांनी या जनसुनावणीत सहभाग घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन श्री. तावरे यांनी केले आहे.