सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे जानेवारी अखेर उद्घाटन खा. उदयनराजे

107
Adv

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. सातार्‍यात जिल्हा पत्रकार भवन व्हावे, ही जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची मागणी पूर्ण झाली आहे. या इमारतीत अत्याधुनिक इक्वीपमेंट उपलब्ध करुन दिली जातील. जानेवारी अखेर पत्रकार भवनाचे दिमाखदार उद्घाटन करू, अशी घोषणा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातार्‍यात पत्रकार दिनी केली.

सातार्‍यात गोडोली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सातारा जिल्हा पत्रकार भवनाची अंतिम पाहणी खा. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी केली. यावेळी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दिपक शिंदे, पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तपासे, डिजिटल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्रे, शरद महाजनी, अरूण जावळे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया लोकांसमोर सातत्याने सत्य मांडण्याचे काम पत्रकार करतात. सातार्‍यात भव्य दिव्य पत्रकार भवन व्हावे अशी अनेक वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी होती ही पूर्ण झाली आहे. चार मजली इमारत पत्रकारांसाठी उपलब्ध झाली आहे. या इमारतीच्या माध्यमातून पत्रकारितेचा प्रसार देशभर होईल. सर्व पत्रकारांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी पत्रकार भवन उद्घाटनाचा दिवस, वेळ ठरवावा. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून राज्यातील ज्येष्ठ पत्रकाराला मान द्यावा, अशी माझी संकल्पना आहे. आम्ही बोलतो ते चार भिंतीत तेवढ्यापुरत मर्यादित असते. आमचे विचार, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम माध्यम करतात. त्यामुळे पत्रकारांची मोठी जबाबदारी असून ती समर्थपणे पेलवावी. समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांच्या माध्यमातून व्हावं. हायटेक इक्वीपमेंट लागतील ती दिली जातील. या इमारतीतून पत्रकारितेचे प्रशिक्षण वर्ग सुरु करावेत. ज्येष्ठ पत्रकारांनी त्यासाठी मार्गदर्शन करावं, असे त्यांनी सांगितले.

हरीष पाटणे म्हणाले, सातार्‍याच्या पत्रकारितेत आजचा दिवस सोन्याचा आहे. गेल्यावर्षी पत्रकार दिनी झालेल्या कार्यक्रमात पुढील वर्षीच्या पत्रकार दिनापर्यंत पत्रकार भवनाचे काम पूर्णत्वाला नेवू व भव्य कार्यक्रम घेऊ असा सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना शब्द आम्ही दिला होता. पत्रकार भवनाचे काम पूर्णत्वाला गेलं आहे. चार मजली इमारतीत बाहेरून येणार्‍या पत्रकारांसाठी निवासाची व्यवस्था, सभागृह, भव्य बैठक व्यवस्था, साहित्यिक व पत्रकारांच्या मुलांसाठी अभ्यासिका, ग्रंथालय, साहित्य परिषदेसाठी सभागृह अशी रचना असलेली ही इमारत आहे. हायटेक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी इक्विपमेंट इमारतीत आणली जातील. पत्रकारांसाठी तसेच त्यांच्या मुलांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व कार्यशाळा होईल. पत्रकार भवन उभारण्याचे दातृत्व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दाखवले. सुसज्ज पत्रकार भवनाची स्वप्नपूर्ती करताना माजी नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व नगरपालिका टीम यांचे सहकार्य लाभले. हक्काचे पत्रकार भवन ही सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचे स्वप्न होत आहे. राज्यातील सर्वात मोठं चार मजली इमारत असलेलं पत्रकार भवन सातार्‍यात होत आहे. सर्व सहकारी आनंदी असून जानेवारी अखेरीस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व राज्यातील ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, किरण नाईक व खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा पत्रकार भवन उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा होईल. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियाचे सर्व पत्रकार या कार्यक्रमास उपस्थित राहतील. सर्वांसाठी हा सोहळा नयनरम्य व दैदिप्यमान असेल. पत्रकार भवनाचे काम पूर्ण झाल्यानंतर खा. उदयनराजे भोसले व सहकार्‍यांसमवेत पाहणी केल्याचा सर्वांना आनंद होत आहे. यावेळी प्रीतम कळसकर, पंकज चव्हाण, अरविंद दामले, राजू घुले, विठ्ठल हेंद्रे, आदेश खताळ, प्रवीण शिंगटे, विशाल गुजर, पद्माकर सोळवंडे, अमित वाघमारे, मृणाल देवकुळे, सिध्दार्थ लाटकर, निखिल मोरे, आदि उपस्थित होते.

Adv