शाहूपुरी परिसरात गेल्या ३० वर्षांपासून असंख्य विद्यार्थी घडवणारी ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था स्थापन करुन बाळासाहेब गोसावी यांनी शैक्षणिक विकासात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. आजमितीस संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतींमध्ये विविध विभागात ७३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दहावीचा निकाल स्थापनेपासून १०० टक्के लागत असून दरवर्षी अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरत आहेत. यामध्ये शिक्षकांचे योगदानही चांगले असून खर्या अर्थाने ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था हे शाहूपुरीचे शैक्षणिक विद्यापीठ असल्याचे गौरवोद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले.
शाहूपुरीतील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या बालक व अभिनव विद्यामंदिर, अभिनव माध्यमिक विद्यालय या तिन्ही शाखांचे ३० वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गोसावी होते. यावेळी यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, संस्थेचे सचिव वासुदेव गोासावी, संचालक अनंत जोशी, दीपक अग्रवाल, गुरमितसिंग रामगडिया, प्रितम कळसकर, प्रतिक बाजारे, संजय शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, शाहूपुरीसारख्या निमशहरी भागात ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था ३० वर्षापासून सर्वच स्तरावर यशस्वीपणे कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले ज्ञानदानाचे पवित्र काम खर्या अर्थाने भावी पिढ्या घडवत आहे. संस्थेच्या माध्यमातून शिकलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. अनेक यशस्वीपणे व्यवसाय करत आहेत. ज्ञान ही कधीही कमी न होणारी संपत्ती असून ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या यापुढील सर्व कार्यात त्यांना माझे सर्वतोपरी सहकार्य राहील.
दशरथ सगरे म्हणाले, शिक्षण संस्था चालवणे ही अवघड गोष्ट असते. मात्र सर्व आव्हानांवर मात करुन संस्थेला उच्च दर्जा प्राप्त करुन देण्यात बाळासाहेब गोसावी यांच्यासह सर्व संचालकांचे मोठे योगदान असून ज्ञानदानातून नव्या पिढ्यात घडत आहेत. विविध क्षेत्रात विद्यार्थी मिळवत असलेले यश कौतुकास्पद आहे. यावेळी श्री. सगरे यांच्यातफें ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेस तीन संगणक देणगी स्वरुपात प्रदान करण्यात आले.
पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी डिजीटल युगात देखील पुस्तकांशी मैत्री करण्याची गरज आहे. वाचनातून घडणारे संस्कार हे जीवन घडवतात तर मोबाईलच्या अतिवापरामुळे बालगुन्हेगारी वाढत आहे. याकडे गांभीर्याने पाहताना पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ज्ञानवर्धिनी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाविष्कार व विविध स्पर्धांमधील त्यांचे यश पाहता येथे चांगले संस्कार करण्याचे काम केले जात आहे हे कौतुकास्पद आहे.
संचालक वासुदेव गोसावी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शालाप्रमुख संतोष सापते यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. यावेळी खा. उदयनराजे भोसले व मान्यवरांच्या हस्ते युपीएसी परीक्षेत यश मिळवलेल्या कृणाल आंबीकर तसेच संस्थेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी वेदांत धोंडुगडे, अक्षर जाधव, वेदांत धनावडे, साक्षी जगदाळे, आदर्श विद्यार्थी आर्यन साळवी, दहावीतील ललित देशींगकर, राज भोसले, श्रुती गोडसे तसेच माजी विथार्थी अक्षय मतकर, सौ. राधिका चव्हाण-देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी रामचंद्र कणसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शालाप्रमुख पी. डी. गावडे, मुख्याध्यापक संतोष सापते बालवाडी विभागप्रमुख सौ. एन. ए. चोरगे, संमेलन कार्याध्यक्ष सचिन जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य क्षीरसागर, मैथिली कर्णे, तसेच शाहूपुरी परिसरातील नागरिक, पालक, शिक्षक उपस्थितीत होते.
Home Politics|Satara District Satara City ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था हे शाहूपुरीचे विद्यापीठ – खा. उदयनराजे भोसले