नेदरलँड देशाच्या वेस्ट ट्रान्सफॉर्मर या प्रथितयश फर्मने थेट सातारा पालिकेला ओल्या कचऱ्यापासून जैव इंधन व खता सह बहुपर्यायी जैविकांचा प्रस्ताव दिला आहे . या टीमच्या पथकाने रविवारी सुट्टीच्या दिवशी सातारा पालिकेला भेट दिली .
वेस्ट ट्रान्सफॉर्मर च्या आशिया विभागाचे ईशानवीर चौधरी, मुंबईच्या टीमचे धीरज लोखंडे, व सातारा विभागातून हेमंत कदम, अनिल अवघडे, इरफान पालकर, समीर बागवान, मनोज सोलंकी या वेळी उपस्थित होते . या टीमने सातारा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांशी नगराध्यक्षांच्या दालनात चर्चा केली . यावेळी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद निशांत पाटील, स्वीकृत नगरसेवक अॅड दत्ता बनकर, सुजाता राजे महाडिक, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, सुनील काटकर, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर, आरोग्य निरीक्षक कायगुडे यावेळी उपस्थित होते .
नेदरलँड या देशातील वेस्ट ट्रान्सफॉर्मर ही फर्म ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत, इथेनॉल, इलेक्ट्रिसिटी, अशा बहुपर्यायी गोष्टीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे . जगात सहा देशांमध्ये सुध्दा वेस्ट ट्रान्सफॉर्मर सक्रीय असून या कंपनीच्या आशिया विभागाचे ईशानवीर चौधरी धीरज लोखंडे आणि पथकाने कराडचा शनिवारी दौरा केल्यानंतर रविवारी सातारा पालिकेला भेट दिली . सातारा पालिकेच्या सोनागाव कचरा डेपोत दररोज 42 टन कचरा जमा होतो . यामध्ये ओला कचरा हा 19 टन असतो . या कचऱ्याच्या वाहतुकीसाठी ठेकेदारांच्या घंटागाडया व इतर व्यवस्थेपोटी पालिकेला दरवर्षी अडीच कोटी रुपये मोजावे लागतात . ईशानवीर चौधरी व इशान चौधरी यांनी कंपनीच्या उत्पादनांची माहिती पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना दिली . फर्मला केवळ पाच शे स्क्वेअर फुटाच्या जागेची आवश्यकता असून तितक्या आटोपशीर जागेत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून जैवइंधन, कंपोस्ट खत, इथेनॉल, विजेची निर्मिती केली जाऊ शकते . घंटागाडयांना सुध्दा हे जैवइंधन वापरले जाऊ शकते . त्यामुळे पालिकेचे विजेचे व इंधनाच्या बिलाची बचत होणार आहे असे चौधरी यांनी सांगितले . हा प्रकल्प सातारा शहरात विकेंद्रित पध्दतीने राबवला जाऊ शकतो .
वेस्ट ट्रान्सफॉर्मरच्या सीईओ येत्या एप्रिल महिन्यात साताऱ्याच्या दौऱ्यावर येण्याच्या विषयावर सुद्धा चर्चा झाली . ओल्यासह सुका कचऱ्यावर प्रक्रिया करून कोणती उत्पादने घेतली जाऊ शकतात याचे सविस्तर प्रकल्प सादर करून त्यावर चर्चा होऊ शकते असे उपनगराध्यक्ष शिंदे व आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी सांगितले .