छत्रपती शिवरायांच्या नावाची अस्मिता व कीर्ती अगाध आहे . मात्र त्यांच्या जयंती सोहळ्याच्या नियोजन कार्यक्रमाला पालिकेतील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवल्याने ही बैठक म्हणजे फार्स ठरली .
विशेष म्हणजे नगराध्यक्ष माधवी कदम रजेवर असताना पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात शिवजयंतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . उपनगराध्यक्ष किशोर शिंदे,नगरसेविका सिध्दी पवार, सुजाता राजेमहाडिक सुनीता पवार, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर, माजी नगरसेवक कल्याणं राक्षे, लेखापाल हिम्मत पाटील, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील मोजकेच अधिकारी यावेळी उपस्थित होते . या बैठकीत भव्य शोभायात्रा व शिवतीर्थावर सुशोभिकरण या गोष्टींवर जुजबी चर्चा झाली .
मात्र ठोस निर्णय कोणताच झाला नाही . शिवजयंतीसाठी पालिकेच्या बजेटमध्ये सात लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मात्र प्रत्यक्ष शिवजयंतीच्या नियोजन बैठकीला एकूण चाळीस नगरसेवकांपैकी केवळ चार पाच नगरसेवक हा विरोधाभास या बैठकीत दिसून आला . काही नगरसेवक पालिकेत टेंडरसाठी बांधकाम विभागात घुटमळले पण त्यांची शिवजयंतीच्या बैठकीला येण्याची बुध्दी झाली नाही . प्रत्यक्ष निर्णयासाठी नगराध्यक्ष , मुख्याधिकारी व साविआचे राजकीय सल्लागार उपस्थित राहणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने केवळ पोकळ चर्चाचा फार्स झाला . येत्या 7 तारखेला साताऱ्यातील सार्वजनिक शिवजयंती साजरी करणाऱ्या मंडळाची बैठक बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले .