सातारा शहरासह जिल्ह्यात करोना बाधितांची परिस्थिती गंभीर असताना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात रेमडे सीवीर इंजेक्शनचा साठा संपल्याची माहिती समोर आली . मात्र खाजगी रुग्णालयांना जी 3315 इंजेक्शन देण्यात आली होती त्याचा हिशोब अद्यापही सादर न केल्याने गोंधळ वाढला आहे .
सिप्ला ,मायलान, या कंपन्याकडून रेमडेसीवीर इंजेक्शनचे जे उत्पादन होते त्या तुलनेत पुणे विभागातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर, पुणे या पाच जिल्ह्यातून तब्बल चाळीस हजार लसींची मागणी आहे . मागणीपेक्षा पुरवठा कमी पडल्याने करोना बाधितांसाठी वरदान ठरणाऱ्या इंजेक्शनचा सातारा जिल्ह्यात तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे . महात्मा फुले जनआरोग्य योजनेत गरजूंना ही इंजेक्शने मोफत देण्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांचे आदेश असताना प्रत्यक्षात रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी शासकीय दरापेक्षा दुप्पट दराने पैसे मोजावे लागत आहे . दोन दिवसापूर्वी एका रुग्णाला चार इंजेक्शनचे तब्बल बत्तीस हजार रुपये मोजावे लागल्याची माहिती समोर आली प्रत्यक्षात रेमडेसीवीर या इंजेक्शनची शासकीय किंमत 3392 रुपये आहे . मात्र आरोग्य व्यवस्थेतील विशेषतः खाजगी रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा काही दलालांनी बाजार मांडला आहे . आणि हा बाजार कसा आणि कोणाच्या आशिर्वादाने चालतो हे खंडाळा तालुक्यातून व्हायरल झालेल्या ऑडियो क्लीपवरून समोर आले आहे .
सातारा जिल्हयाची इंजेक्शनची मागणी जवळपास सहा हजार लशींची आहे मात्र रेम डेसीवीरच्या प्रचंड तुटवड्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावाधाव होत आहे . आणि त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आरोग्य व्यवस्थेतील दलाल मढयाच्या टाळूवरचे लोणी खाताना दिसत आहेत . इंजेक्शनच काय तर ऑक्सीजन बेडची सुद्धा लिलाव पध्दतीने छुपी बोली लावली जात आहे . साताऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये ऑक सीजन बेड मिळवण्यासाठी एका रुग्णाला पाच हजार रुपयांची तडजोड तेथील व्यवस्थापकाशी करावी लागली मात्र हा रुग्ण तेथे जाण्यापूर्वीच दुसऱ्या एका रुग्णाच्या नातेवाईकांनी आठ हजार रूपये देऊन बेड खरेदी केला होता . अमृता प्रमाणे गोड सेवा देणाऱ्या त्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण व प्रशासन यांच्यात जोरदार बाचाबाची झाली मात्र वाद सोडून आजाराच्या भीतीने रुग्णाला सातारा सोडून आधी वाईत हातपाय मारून खंडाळ्याला उपचारासाठी जावे लागले .
चौकट-
इंजेक्शनचा हिशोब देणार कधी ?
जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार दहा दिवसा पूर्वी उपलब्ध 4013 रेमडेसीवीर इंजेक्शन पैकी 3315 इंजेक्शन खाजगी रुग्णालयांना देण्यात आली . रुग्णालयांनी जितकी इंजेक्शने घेतली तितक्या इंजेक्शनचा खर्च उत्पादक कंपनीला द्यायचा होता . जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा रुग्णालय यांच्यावरील हिशोबाचा ताण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी ही सूचना केली होती . मात्र खाजगी हॉस्पिटल्सनी या सूचनेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून अद्यापही या इंजेक्शनचा हिशोब दिलेला नाही त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील या गंभीर त्रुटी प्रकर्षाने समोर आल्या आहेत . जिल्हा रुग्णालयात सध्या अपवाद वगळता रेमडेसी वीरचा साठा संपला असल्याचे सांगण्यात आले . अडीच हजार लशींची मागणी नोंदवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली .
रेमडेसीवीरचा तुटवडा का ?
– मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांची वाढती संख्या
– आरोग्य विभागात दलालांचे वाढते प्रस्थ
– मागणीच्या तुलनेत कंपनीकडून कमी पुरवठा
-शहरासह जिल्हयातून इंजेक्शन ला मोठी मागणी
– इंजेक्शनच्या काळ्या बाजारावर नियंत्रण नाही