प्रशासनाच्या चर्चेनंतर होणारा मूक मोर्चा स्थगित नगरसेवक अमोल मोहिते यांची माहिती जिल्हाधिकार्‍यांची कोव्हिड डिफेंडर्स ग्रुपबरोबर हि चर्चा

89
Adv

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना जिल्हा प्रशासनाकडून योग्य उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात मोर्चाचा पवित्रा घेण्यात आला होता. परंतु, शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत उपाययोजना करण्याबरोबरच उपस्थित केलेल्या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक दखल घेतल्याने सोमवारी काढण्यात येणारा मोर्चा स्थगित केल्याची माहिती नगरसेवक अमोल मोहिते यांनी दिली.
कोरोनाच्या परिस्थितीत प्रशासनाची योग्य नसलेली कार्यपध्दती, ऑक्सिजन बेड उपलब्ध करा, हॉस्पिटलची यंत्रणा कार्यान्वित करा, 1077 ही सक्षम करा, जम्बो हॉस्पिटलचा कार्यक्रम द्या, सरसकट बिलांची तपासणी करा, या मागण्यांसाठी नगरसेवक अमोल मोहिते यांनी जिल्हा प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.मात्र, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अमोल मोहिते यांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी थेट चर्चा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, कोव्हिड डिफेंडर्स ग्रुपचे विनित पाटील, शरद काटकर, हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी, प्रशांत मोदी, तुषार तपासे, ओंकार कदम हेही बैठकीला उपस्थित होते.

अमोल मोहिते व कोव्हिड डिफेंडर्स ग्रुपने विविध मागण्या व नागरिकांमधून होत असलेल्या तक्रारी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी किती बेड उपलब्ध आहेत हे येत्या दोन दिवसात डॅशबोर्डद्वारे प्रसिद्ध केले जाईल, त्याबाबतचेे अपडेट प्रत्येक दोन तासाला देण्यात येतील. प्लाझ्माचा तुटवडा भासू नये म्हणून सातारा सिव्हिलबरोबरच आणखीन चार ठिकाणी प्लाझ्मा बँक्सना परवानगी देण्यात येणार आहे. प्रत्येक रूग्णाच्या केसपेपरवर ब्लड ग्रूप टाकण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जम्बो कोव्हिड हॉस्पिटल सुरू होईल. त्यानंतर कोव्हिडबाबतचा ताण कमी होईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. याशिवाय जिल्हा क्रीडा संकुलात आणखी एक कोव्हिड हॉस्पिटल उभे करण्यात येईल, अशी ग्वाहीही जिल्हाधिकार्‍यांनी दिली.
जे रुग्ण शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे त्यांच्यासाठी 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. खासगी रूग्णालयांनाही त्यांची मागणी विचारली असून याचा पुरवठा लवकरच करणार आहे, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
गर्भवती महिलांसाठी विशेष काळजी घेतली जाणार असून त्यासाठी एक मेकॅनिझम ठरवून विशेष आदेश काढले जातील. याबरोबरच खाजगी रुग्णालयाकडून इंजेक्शनची थकबाकी वसूल करतानाच यापुढेे प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर महात्मा फुले योजनेचा बोर्ड, सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यामध्येच पेशंट्स अ‍ॅडमिट करून घेणे, जादा बिलाची आकारणी करणार्‍या रूग्णालयांवर कडक कारवाई करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकार्‍यांनी दिली.
मोहिते यांनी मुकमोर्चाचा इशारा देताना केलेल्या मागण्यांबाबत जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने निर्णय घेतल्याने अमोल मोहिते यांनी मुकमोर्चा स्थगित केला असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासमवेत माझी तसेच कोव्हिड डिफेंडर्स ग्रुपच्या सदस्यांची बैठक झाली. मी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. काही चांगले निर्णय बैठकीत झाले. त्याची अंमलबजावणी होईल याची खात्री वाटत असल्याने सोमवारी पुकारलेला मुकमोर्चा तूर्त स्थगित करत आहे.
– अमोल मोहिते, नगरसेवक

Adv