सातारा पालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीचा बुधवारी दि. 21 रोजी ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणार आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्य सरकारने महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायतींना उपाध्यक्ष, विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडी करण्याचे आदेश निर्गमित केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर करण्यात आला.
मंगळवारी दि. 20 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, बुधवारी दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता अर्जांची छाननी व त्यानंतर दुपारी तीन वाजता नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाईल. भाजपचे स्वीकृत नगरसेवक विकास गोसावी यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.
रिक्त झालेल्या या पदासाठी भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींपुढे इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये सध्या तरी विठ्ठल बलशेटवार, जयदीप ठुसे, आप्पा कोरे व सुनील काळेकर यांची नावे चर्चेत आहेत. स्वीकृत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांच्या जागी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक बाळासाहेब ढेकणे यांचे नाव आघाडीवर आहे. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीत मात्र खांदेपालटाच्या कोणत्याही घडामोडी सुरू नाहीत. त्यामुळे अविनाश कदम हेच स्वीकृत सदस्यपदी कायम राहणार असे सध्याचे चित्र आहे.