असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्येतील कार्यक्रम

103
Adv

देशातील ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली.

दरम्यान, यासोहळ्यासाठी मंदिर परिसर आणि अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचे दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

असा असेल पंतप्रधानांचा अयोध्येतील कार्यक्रम…

* ५ ऑगस्ट सकाळी ९.३५ वाजता दिल्लीतून प्रस्थान
* १०.३५ वाजता लखनौ विमानतळावर लँडिंग
* १०.४० वाजता अयोध्येसाठी हेलिकॉप्टरमधून प्रस्थान
* ११.३० वाजता अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लँडिंग
* ११.४० हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा
* १२.०० राम जन्मभूमी परिसरात पोहोचण्याचा कार्यक्रम
* १२,१५ वाजता परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
* १२.३० वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम
* १२.४० राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम
* १४.०५ वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडसाठी प्रस्थान
* १४.२० वाजता लखनौसाठी प्रस्थान
* लखनौवरून दिल्लीसाठी रवाना

बुधवारी दुपारी १२ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. परंतु त्यापूर्वीच सर्व आमंत्रित पाहुणे आज अयोध्येत पोहोचणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळपासून अयोध्या सील करण्यात येईल. श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून एकूण १७५ जणांना भूमिपूजनाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यापैकी देशातील निरनिराळ्या भागातील संतांचा समावेश आहे. दरम्यान, देण्यात आलेल्या प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर एक कोड छापण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तो कोड तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मंदिर ट्रस्टकडून सर्वप्रथन इक्बाल अन्सारी यांना निमंत्रण देण्यात आले होते. ते सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीकडून पक्षकार होते. इक्बाल अन्सारी हे भूमिपूजना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागतही करतील. याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत विशेष अतिथी म्हणून दाखल होणार आहेत. तर दुसरीकडे अशोक सिंघल यांच्या कुटुंबीयांनादेखील या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

Adv