सातारा जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढली आहे. कराड,जावळी तालुक्यातील वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. सातारा शहरातही करोना बाधित रुग्ण सापडले असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. सातारकरांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करत असून सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष व भाजपाचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारानामाशी बोलताना केले आहे.
सातारा, कराड नंतर जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारी प्रतापगंज पेठ येथे करोना बाधित आढळल्यानंतर सातारा शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते . या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी जनतेला आधार दिला आहे.
आजपर्यंत सातारा शहर करोना पासून सुरक्षित होते परंतु नगरपालिका हद्दीत करोना बाधित रुग्ण आढळला आहे. कराड भागातील रुग्ण संख्याही वाढत असल्यामुळे त्या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत
. परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही,आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. प्रशासन मोठ्या हिम्मतीने काम करत असून त्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे. सातारा जिल्ह्यातील कराड व सातारा ग्रामीण भागातील बाधित क्षेत्रातील प्रत्येक गोष्टींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. प्रशासनाने घालून दिलेल्या प्रत्येक नियम व अटींचे तंतोतंत पालन करणे खूप गरजेचे असेही खा श्री छ उदयनराजे यांनी म्हटले आहे.