स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि सोबत साजुक तुपातील जिलेबीचा गोडवा हा योग यंदाच्या पंधरा ऑगस्टला जुळून येणार नाही. करोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिलेबी उत्पादन, विक्री व वाटप करण्यास मनाई केल्याने मिठाई विक्रेत्यांना लाखो रूपयांच्या उत्पन्नांवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
या नियमात जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिलता द्यावी, या मागणीसाठी शहरातील मिठाई संघटनेच्या वतीने साताऱ्यातील लोकप्रतिनिधींना साकडे घालणार आहेत. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असून दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला जिलेबी वाटण्याची मोठी परंपरा आहे. या दिवशी साताऱ्यात तब्बल सात ते आठ टन जिलेबीची विक्री होते.
नगरपालिका शाळांमध्ये ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांना जिलेबीचे खाऊवाटप केले जाते. मात्र, यंदा जिलेबीचा हा गोडवा चाखता येणार नाही. करोनाचा धोका लक्षात घेऊन शहरातील मिठाई विक्रेत्यांनी जिलेबी उत्पादन, विक्री व वाटपाला मनाई आदेश मंगळवारी सायंकाळी निघाला. या आदेशामुळे शहरातील मिठाई व्यावसायिकांच्या उत्साहावर पाणी पडले.
नियंत्रित लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सुविधेची परवानगी आहे तर मिठाई व्यावसायिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून मालाची विक्री करायची आहे. मात्र, जिलेबी विक्रीच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने शहरातील मिठाई व्यावसायिकांची चांगलीच चलबिचल झाली.
शहरात पंधरा ऑगस्टच्या दिवशी जिलेबी विक्री करणारे शंभरहून अधिक विक्रेते आहेत. तब्बल सात ते आठ टन जिलेबीची विक्री होऊन 25 लाख रुपयांची उलाढाल होते. स्वातंत्र्यदिन जवळ आल्याने विक्रेत्यांची कच्च्या मालाच्या तयारीपासून आचारी गोळा करण्याची धावपळ सुरू होती.
मात्र. शासकीय आदेशामुळे जिलेबीचा गोडवा कडू झाला. यामधून काही शिथिलता मिळावी यासाठी मिठाई संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यातील लोकप्रतिनिधींना भेटणार आहेत, असे चंद्रविलास हॉटेलचे मालक वसंतशेठ जोशी यांनी सांगितले.