सातारा – जावली तालुक्याचे आमदार हे सत्तेसोबत राहण्याची वहिवाट परंपरेने चालवित आहेत.१९७८ सालापासून त्यांच्या घरात पक्षाची निष्ठा हा विषयच नाही. ज्याची राज्यात सत्ता त्यांना यांचा लवून मुजरा असतो. आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते पवारसाहेब आणि अजितदादा हे सातारा दौऱ्यावर आल्यावर ते गोंडा घोळत सातारा आणि कराडच्या सर्किट हाऊसवर येतात. त्यांनी ही बिन बुलाए मेहमाननवाजी यापुढेही कायम करत रहावी. पण ते करतानाच मतदारसंघात दलाल आणि गुत्तेदारांच्या कोंडावळ्यात वावरताना राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिपक पवार यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा – जावलीच्या विद्यमान आमदारांच्या घरात राजकीय निष्ठांची मोठी टंचाई आहे. ते ज्या पक्षात असतात, त्या पक्षाशी कधीच प्रामाणिक राहत नाहीत. जनत पक्षात असताना इंदिरा काँग्रेसमध्ये त्यांची उठबस होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना
काँग्रेस आणि भाजपबरोबर त्यांची ऊठबस होती. काहीही सबळ कारण नसताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, पण तो पक्ष सोडताना ज्या पक्षाच्या पॅनेलमधून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडून आले, त्या पक्षाच्या बहुमतावर बँकेचे अध्यक्ष झाले. त्या पदावर जसा गुळाला मुंगळा चिकटतो तसे चिकटून बसले आहेत. ते पद कोणत्या राजकीय, नैतिक आणि वैचारिक कारणाने ते आपल्या बुडाखाली घेऊन बसले
आहेत. मुळातच काही विधीनिषेध नसल्याने त्यांना या राजकीय व्यभिचाराबद्दल कसलीही संवेदना जाणवत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थिर झाले आहे. त्यामुळे सातारा – जावलीच्या स्थानिक आमदारांना पुन्हा एकदा सत्ताधारी असणाऱ्या आमच्या नेत्यांचा अनुनय करावा लागत आहे.
मतदारसंघातील विकासकामांच्या नावाखाली ते पूर्वी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या मागेपुढे पळत होते. आता पण विकासकामांच्या नावाखाली आमच्या नेत्यांच्या पुढे गोंडा घोळत आहेत. सातारा शहरातील रस्त्यांसाठी ५० कोटी, हद्दवाढ जणू काही झालीच असे ठासू सांगणारे हे आमदार एक वर्ष उलटल्यानंतर
लबाड ठरले. राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता असली की विरोधी पक्षामधून निवडून आल्यावर किमान राजकीय नैतिकता सांभाळतात. तशी त्यांनी ती सांभाळायला हवीच. लोकप्रतिनिधी म्हणून सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकांना उपस्थित राहणे स्वाभाविक आहे. मंत्र्यांना त्याच्या कार्यालयात भेटणे हे सुद्धा लोकशाहीतील राजशिष्टाचारामध्ये बसते. पण सातारा – जावलीच्या आमदारांना आमच्या पक्षाचे
कोणतेही मान्यवर बोलवित नसताना ते खासगी व संस्थात्मक दौऱ्यावर आल्यावर सर्किट हाऊस, हॉटेल येथे येऊन लाचारशिष्टता नावाची नवीन परंपरा निर्माण करत आहेत. त्या पक्षाशी तो द्रोह आहे. त्यावरुन हे महाशय ज्या पक्षात असतात त्या पक्षाशी प्रामाणिक नसतात, याची नोंद त्या पक्षाने घ्यावी.सातारा – जावली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम जोरदार सुरु आहे. आता आमदारांची स्थानिक राजकारणातील लुडबुड आम्ही सहन करायचा विषयच नाही. प्रशासन, स्थानिक संस्था,सहकारी संस्था जशा ज्या त्यांनी पूर्वी वाटण्यासाठी केल्या होत्या, त्या आता वेण्णा धरणात बुडाल्या
आहेत. त्यांना आमच्या नेत्यांबद्दल प्रेम असेल तर जावली तालुक्यातील लुडबुड करुच नये. ते प्रेम खोटे असेल तर पक्षाच्या बॅनरखाली फिरावे. पक्षाच्या चिन्हावर जावली तालुक्यात यावे. त्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत कागद – पेन – स्टेपलर – शाईतसुद्धा चरायचे तातडीने बंद करुन अध्यक्षपद सोडावे, अन्यथा स्वतःला राजकीय बेशरम घोषित करावे.सत्तेचा मोह अगदीच सुटत नसेल तर भाजपमध्ये राहून सकाळी आमच्या नेत्यांचे न चुकता स्वागत करावे. दुपारी आमच्या पक्षाच्या सत्तेचा उपभोग घ्यावा आणि त्यानंतर आमच्या पक्षाच्या विरोधात शिमगा करणाऱ्यांच्या सोबत जावे. विधीमंडळात एक दिवस सत्ताधारी बाकावर बसावे. दुसऱ्या दिवशीपक्ष शिस्त म्हणून विरोधी बाकावर बसावे. घराच्या एका दारावर आमच्या पक्षाचा झेंडा लावावा, दुसऱ्या दारावर ते ज्या पक्षात आहेत, तो झेंडा लावावा. गाडीत महाआघाडीच्या तीन प्रमुख पक्षांच्या टोप्या ठेवाव्यात. ज्या पक्षाचे मंत्री येतील त्या पक्षाची टोपी घालून फोटो काढावेत. सत्तेशिवाय राहू शकत नाही, सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला उभे राहिल्याशिवाय अंग भिजत नाही, हे जाहीर करावे.