सातारा पालिकेच्या गुडगुडी बाबाची राजकीय मस्ती शनिवारी यवतेश्वरच्या घाटात उतरली . पालिकेच्या वाहनाने कासवरून माघारी येणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतल्या या गुडगुडी बाबाला किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या भांडणातून एका तळ्यावरच्या युवकांनी चोप दिला . रात्री साडेआठ पर्यंत साताऱ्यात हे सुरू असलेल्या या बेताल नाटयाची पालिका प्रशासनाला गंधवार्ताही नव्हती .
सातारा शहरातील करोना प्रतिबंधाची मोठी जवाबदारी सातारा पालिकेच्या आरोग्य विभागावर आहे . या विभागाचा लाडावलेला आरोग्य निरीक्षक याचा राजकीय मस्तवालपणा दाखवणारा आणखी एक किस्सा शनिवारी उघड झाला . आधी दुबई वारी मग क्वारंटाईन नियमाचा भंग, नंतर आरोग्य विभागाशी हुज्जत, पालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या टक्केवारीची रेकॉर्ड सीडी, या गुडगुडी बाबाने चुकांची कर्मदरिद्री अक्कल तरी किती पाजळावी . शनिवारी पुन्हा पालिकेच्या आरोग्य विभागाची अब्रू चव्हाट्यावर टांगण्यात त्यांनी कोणती कसर ठेवली नाही . दुपारनंतर कास मार्गवरील निसर्गरम्य परिसरात गुडगुडी बाबा बैठकीतल्या मित्रांसह मेजवानीसाठी गेले होते . आता नसलेल्या कामाचा ताणच इतका आहे की श्रमपरिहार तो बनतोच . मेजवानी उरकल्यावर गुडगुडी बाबांने पालिकेच्या परिवहन विभागाने भाड्याने घेतलेली व्हाईट कलरच्या तवेरा गाडी चालकाला फोन केला . मात्र गाडीमालकाने उशिरा गाडी कास परिसरात नेण्यास नकार दिल्यावर गुडगुडी बाबाची मद्यधुंद अवस्थेत तुला माहित आहे का मी कोण ? या शब्दात मिजास चालू झाली . कसबसं प्रकरण शांत होऊन तवेरा चालकाने गुडगुडी बाबाला गाडीत घालून माघारी आणले तर यवतेश्वरच्या घाटात त्यांची साताऱ्यातील एका तळ्यावरच्या युवकांशी बाचाबाची झाली . तेव्हा संतापलेल्या युवकांनी घाटातच गुडगुडी बाबाला चांगलाच चोप देत त्याचे चंद्रावर गेलेले विमान जमिनीवर आणले . घाटात सामसूम होती मात्र माहिती ला पाय फुटले आणि ही ब्रेकिंग न्यूज सातारा नामाच्या हाती पडली . गुडगुडी बाबाच्या मिजास खोर आणि हेकट वागण्याच्या नाट्याचा सातारा नामाने पुन्हा एकदा पर्दाफाश केला .
चौकट –
प्रशासनाने ठेवले पुन्हा कानावर हात
गुडगुडी बाबाच्या अगाध राजकीय लीला या चौकटी बाहेरच्या असल्याने त्या पचवताना पालिका प्रशासनाचा जीव घाबराघुबरा होतो . पालिकेच्या परिवहन विभागाची गाडी प्रशासनाच्या परवानगी शिवाय बाहेर कशी गेली ? हा प्रश्न ओघाने उपस्थित होतो . गुडगुडी बाबांच्या या रंगीत कार्यक्रमाची ना मुख्याधिकाऱ्यांना कल्पना होती ना आरोग्य विभागाचे प्रमुख असणाऱ्या उपमुख्याधिकाऱ्यांना . प्रशासनाने या प्रकरणी पुन्हा एकदा कानांवर हात ठेवले . प्रशासनात लाडावलेल्या बाळावर कठोर कारवाई करा अन्यथा धुमाळ साहेब या बेताल आरोग्य निरिक्षकाला आवरा अशी सातारकरांची अपेक्षा आहे . म्हातारी मेल्याचं दुःख नाही गुडगुडी बाबाच्या निमित्ताने काळ सोकावतोय हे दुर्दैव आहे .