लॉक डाऊनच्या काळात पालिकेत ठरतयं बदल्यांच सेटिंग
सातारा पालिकेत सध्या करोनाच्या आडून केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्यांची खोगीरभरती वाढली आहे . पालिकेतील गुडगुडी बाबाच्या विभागात कामाचे नुसतेच सोंग घेतलेल्या गुडगुडी बाबाने थेट मुख्याधिकाऱ्यांनाच बदलीने बारामतीला पोहचवण्याचे आश्वासन दिले आहे . म्हणजे पालिकेत सत्ता कोणाची आणि राजकीय वटवट राज्यमंत्र्यांच्या पोपटांची, अशी विरोधी परिस्थिती दिसू लागली आहे .मी मी म्हणणाऱ्या सातारा पालिकेतल्या सगळ्याचं नगरसेवकांनी मिठाच्या गुळण्या धरल्याने एका सामान्य लिपिकाची मिजास किती वाढली आहे ? याचे प्रत्यंतर रोजच येऊ लागले आहे .
सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे सध्या कोणालाच जुमानत नसल्याचे चित्र आहे .गेल्या तीन वर्षापासून त्यांचा हा आक्रस्ताळा कारभार पालिकेच्या मुळांवर आला आहे . साताऱ्याच्या नगराध्यक्ष माधवी कदम यांनाही उलटसुलट उत्तरे देणाऱ्या गोरेंचा पश्चिम महाराष्ट्रातच बदलीचा खटाटोप मंत्रालयातून सुरू आहे . त्यासाठी त्यांनी काही उच्च पदस्थांची शेपूट धरून त्यांना मोठया गांधी बाबाची माया सुध्दा दाखवली आहे . आधी लोकसभा नंतर विधानसभा त्यानंतर राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमं आणि आता करोनाची आपत्कालीन स्थिती, रिकामे पणे खुर्चीत बसून प्रचंड कामाचा आव आणायचा हा अभिनयं वठवताना साहेबांचा घामटां निघाला साहेबांचे मूळ गाव पाडेगाव आणि आलिशानं मुक्काम बारामती इथेच बदलीचं गणित जुळवण्याचा साहेबांचा आटापिटा सुरू आहे . बारामतीत ल्या आलिशान बंगल्याच्या वास्तुशांतीचा प्रसाद फक्त नगर विकास आघाडीच्या एकाच नगरसेवकाला मिळाला आहे .
आता साहेबाची बदली करून घेण्याची जवाबदारी एका विभागातील गुडगुडी बाबाने घेतली आहे .टक्केवारीची गोंडस पाकिटे बिनबोभाट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याने म्हणूनच तर गुडगुडी बाबाचा राजकीय मस्तवालपणा खपवून घेतला जात आहे . संचित नामक गोंडस अधिकारी सुद्धा गुडगुडी बाबाच्या घोळात आले आहेत . या अधिकाऱ्याचं काम एकदम चोखं आणि सगळा हिशोब ही रोख त्यावरूनच तर एका विभागात मोठा गृहकलहं पेटला होता . त्यात गुडगुडी बाबा इतका इमानदार की साहेब तुम्ही हजर झाल्याशिवाय काही वाटप होणार नाही असा शब्द देऊन बसला .
या संवादाची रसभरीत ध्वनीमुद्रणे उजेडात आल्यावर मटणाचं हाडं अचानक घशातं अडकावं तशी सगळ्यांची अवस्था झाली . हे प्रकरण तातडीने मिटवण्यासाठी जोरदार राजकीय जोर बैठका झाल्या मात्र बोलाची कढी आणि बोलाचा भात करणाऱ्यांनी या प्रकरणात कोणताच बोध घेतला नाही . आता टक्केवारीचा मोर्चा अचानक शहर विकास विभागाकडे वळवण्यात आला आहे . तेथूनही काही माया शिपायाच्या हस्ते गोळा करण्यात आल्याची पक्की माहिती सातारा नामाकडे आहे . ‘देखणं रूपडं साजिरं आणि लक्ष्मी दर्शनाचं लागीरं ‘ आता हे वर्णन कोणाला लागू पडतं हे सातारा नामाने फोडून सांगायला नको, सातारकर प्रचंड सूज्ञ आहेत .
गुडगुडी बाबाने काही जणांना जवळ घेऊन पक्की लॉबी कशी बांधावी याकरिता बैठकांचे फड रंगवायला सुरवात केली आहे . यात राजकीय पाटीलकीचा जाच आहे त्यावर सुद्धा उतारा शोधण्याचे काम सुरू आहे . तिकडे बांधकाम विभागाचे कारभारी मानसी पुलाच्या निमित्ताने भलत्याच गळाला लागल्याची चर्चा आहे . मात्र गुडगुडी बाबाचा राजकीय घरोबा कोणत्या वाड्यावरचा नाही तर पोवई नाक्यावरचा असल्याने पालिकेत राजकीय सत्ता कोणाची याचीच शंका येऊ लागली आहे .
विरोधी पक्षातल्या नेत्यांचे नाव घेऊन हस्तक गुरगुरतात भाजपचे चाळीस नगरसेवक उघडया डोळ्याने तमाशा बघतात यापेक्षा वेगळा दैवदुर्विलास कोणता ? खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या राजकारणाची वेगळी उंची आहे . जिल्हयातील सर्वच नेत्यांशी राजकारणातील उत्तम सलोखा त्यांनी जपला आहे . त्याला दृष्ट लावण्याचे नतद्रष्ट कार्य काही छपरी बहाद्दर करत असतील तर त्यांची नाटकं सातारकर अजिबात खपवून घेणार नाही . कोणी सातारनामाच्या नावे बोटे मोडत असेल तर मोडू दे . राजकीय विसंगती आणि सातारकरांच्या जीवावरची दुकानदारी खपवून घेतली जाणार नाही . यापुढेही पुराव्यानिशी सातारा नामा अशा गल्लाभरूंचे वस्त्रहरण करतच राहणार यात शंका नाही .