आधी दुबई वारी नंतर क्वारंटाईन पिरियड चा भंग अशा उचापती करणाऱ्या पालिकेतल्या गुडगुडी बाबाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे . सातारा शहर लॉक डाऊनमुळे कुलूपबंद असताना गुडगुडी बाबाने एका ज्येष्ठ नगरसेवकासह बोगदा परिसरात जंगी मेजवानीचा बेत रंगवल्याचे वृत्त आहे . या पार्टीला पालिकेचा एक ठेकेदारही उपस्थित होता .
विशेष म्हणजे ज्यां गुडगुडी बाबावर कारवाई करायची घोषणा पालिकेतल्या एका चाणक्याने केली त्यालाच मॅनेज करण्याचा अफलातून डाव गुडगुडी बाबाने रंगवला . रात्री साडेआठ नंतर बोगद्याच्या पलीकडे ही पार्टी रंगली . सामिष भोजनाचा सगळा जामानिमा आणि खास कोटयातील सुरा या पार्टीसाठी उपलब्ध होती . ती कशी उपलब्ध झाली ? तर लॉक डाउनचे नियम हे सामान्यांसाठी असतात व्हीआयपी लोकांसाठी नाही हे आधी समजून घ्यायला हवे . पालिकेतला एक वजनदार चाणक्य यांचा घसा गुडगुडी बाबाने खास पध्दतीने ओला केला .आता तुम्ही म्हणाल पार्टीचे काय निमित्त होते ? तर पालिकेत खाऊगिरीच जमून आलेलं पितळं जे सातारानामाच्या रोखठोक बातम्यांनी सारखं उघडं पडतय, त्याच्या बंदोबस्तासाठी रणनीती ठरवणारी ती बैठक होती .
. उगाच सत्ताधाऱ्यांचा कोप नको म्हणून गुडगुडी बाबांनी कारवाईचे झेंगट टाळण्यासाठी पार्टीचा आटापिटा केला .पार्टीत सहभागी झालेल्या फुटकळ ठेकेदाराने काही नव्या ठेक्यांसाठी चाणक्यांना गळ घातल्याची चर्चा आहे तर गुडगुडी बाबाने थेट टक्केवारीची टेप पार्टीत वाजवत आता काही जणांचा होणारा जाच थांबवा याचे गाऱ्हाणे घातले .
तरी सुध्दा बोगद्या बाहेर रंगलेल्या पार्टीतील मटणाच्या रश्शाचा व खमंग चर्चेचा राजकीय सुगंध साताऱ्यात पोहचलाच . याची खबर सर्वात आधी केवळ सातारा नामाकडेच पोहचली . फार डोळ्यावर येतील अशा उचापती पालिकेत होऊ नये असा सल्ला चाणक्याने गुडगुडी बाबाला दिला . गुडगुडी बाबाने लॉक डाऊनमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून कशी पार्टी केली ? आता या तरी प्रकरणाचा खुलासा मागविला जाणार आहे का ? याचा खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे . गुडगुडी बाबाच्या या टक्केवारीच्या प्रकरणात चोर व पोलीसाचेच मेतकूट जमल्याचा सोयीस्कर भांडाफोड सातारा नामाने केला . त्यामुळे सातारा पालिकेतील टक्केवारीचा प्रशासनातील गैरप्रकाराच्या रोगाचा संसर्ग शहराच्या पूर्व भागालाही झाल्याचे स्पष्ट झाले आहे . सातारानामा हा सातारकरांच्या अस्मितेसाठी भांडणारी चळवळ आहे . त्यांच्या नावाखाली जर कोणी हरामखोरपणा करणार असेल तर त्याचे वस्त्रहरण पुराव्यानिशी होत चं राहणार हे संबधितांनी लक्षात ठेवावे .