पालिकेतल्या गुडगुडी बाबाला अखेर मुख्याधिकाऱ्यांची नोटीस
चोवीस तासात खुलासा करण्याचे आदेश
सातारा दि 24 ( प्रतिनिधी )
आधी क्वारंटाईन पिरियड चा भंग आणि नंतर राजकीय पावशेर दाखवणाऱ्या आरोग्य विभागाच्या गुडगुडी बाबाला अखेर नोटीस बजावण्यात आली आहे . सातारा नामाने हे प्रकरण धसास लावल्याने पालिकेला कारवाई करण्याची वेळ आली .
फक्त तू मारल्यागत कर मी रडल्यागत करतो असा राजकीय ड्रामा पालिकेत रंगवला जाणार नाही ना याकडे प्रसारमाध्यमांचे बारकाईने लक्ष आहे . गुडगुडी बाबांची दुबई वारी आणि अन्न धान्य कीटवाटपात मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याच्या घटनांचे पालिका वर्तुळात प्रचंड राजकीय पडसाद उमटले आहेत . गुडगुडी बाबाची मिजास सातारनामाच्या परखड आणि दणकट लेखणीने पुरती मोडून काढली . दोन वेळा क्वारंटाईन झालेल्या गुडगुडी बाबाने आपले राजकीय वजन पोवई नाक्यावरून दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या केविलवाण्या प्रयत्नांच्या सुध्दा सातारानामा ने चिंध्या केल्या . सततच्या पाठपुराव्याने प्रशासनावरील दबाव प्रचंड वाढला होता . आरोग्य विभाग प्रमुखांनी गुडगुडी बाबांच्या कारनाम्यांचे सविस्तर अहवालाची टिप्पणी सादर केली होती . तो अहवाल फाईलबंद ठेवण्याची तयारी झाली होती . मात्र जिल्हा प्रशासनाकडून विचारणा झाल्याने पालीकेत धावाधाव झाली . तब्बल पंधरा दिवसाच्या विलंबाने मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी आरोग्य विभागाच्या गुडगुडी बाबाला नोटीस काढून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा येत्या चोवीस तासात करण्याचे आदेश दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे
चौकट-
सातारानामाचे आहे बारकाईने लक्ष
सातारकरांच्या आरोग्याची काळजी वाहणारी यंत्रणा ही पारदर्शी असावी . राजकीय मिजास करून जर कोणी राजकीय तुंबडया भरणार असेल तर ती सातारकरांची प्रतारणा आहे . लक्ष्मी दर्शनातील गांधी बाबा कोणाच्या खिशात किती टक्क्याने जातात याचे सज्जड पुरावे आहेत . उगाचच कोणीही गमजा करू नये , नाहीतर पुढची लेखमाला यापेक्षा स्फोटक असू शकते . गुडगुडी बाबावर नोटीशीची कारवाई झाली यासाठी अनेक सजग सातारकरांनी सातारानामाला मनापासून धन्यवाद दिले आहेत .