नगर विकास आघाडीचा नगरसेवक बाळू उर्फ विनोद खंदारे याने उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेऊन स्वतःची पँट उतरवण्याचे आक्षेपार्ह वर्तन केल्याने शुक्रवारी एकच गोंधळ झाला .
पालिका कर्मचाऱ्यांनी खंदारे याच्या कृत्याचा निषेध करत काम बंद आंदोलन केले . जोपर्यंत पालिकेचे वातावरण दहशतमुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी देत नगराध्यक्ष माधवी कदम यांना निवेदन सादर केले . खंदारे यांच्या या वादग्रस्त वर्तनामुळे नगर विकास आघाडीची पुरती कोंडी झाली आहे .
खंदारे यांच्या वॉर्ड क्रं 7 मधील शौचालयाच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या अजेंडयावर घेतले जात नसल्याची नगरसेवक बाळू खंदारे यांची तक्रार होती .सत्ताधाऱ्यांकडून आपले विषय जाणीवपूर्वक अडविले जात असल्याचा खंदारे यांचा समज झाला . शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या केबिनमध्ये खंदारे यांनी प्रवेश करून आधी त्यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेवली . तुम्ही आमची कामे करत नाहीत आता मी इथेच घाण करतो असे तावातावाने म्हणत खंदारे धुमाळ यांच्या टेबलावर चढले आणि स्वतःची पँट गुडघ्या पर्यंत खाली घेतली . धुमाळ यांनी खंदारे यांना टेबलावरून उतरवून त्यांची समजूत घातली आणि सभासचिव अतुल दिसले यांना समक्ष बोलावून स्थायी चा अजेंडा वाचायला दिला .विषयपत्रिकेवर शंभर व एकशे एक क्रमांकावर विषय घेण्यात आल्याचे समजताच खंदारे पँट घालून खुर्चीत बसले मात्र मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या केबिनमध्येही घाण करणार अशी खंदारेची बडबड सुरूच होती . काही वेळानंतर खंदारे तेथून निघून गेले
खंदारे याच्या अभद्र वागण्याचा बोभाटा झाल्याने पालिका कर्मचारी प्रचंड आक्रमक झाले . तातडीने काम बंद आंदोलन सुरू करून पालिकेच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली . जोपर्यंत दहशतमुक्त वातावरण पालिकेत तयार होत नाही तोपर्यंत कोणीही काम करणार नाही असे निवेदन कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष माधवी कदम , उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व मुख्याधिकारी शंकर गोरे यांना सादर केले . बाळू खंदारे याची पालिका कर्मचाऱ्यांना नेहमीच दमदाटीची भाषा असते त्यामुळे कर्मचारी तणावात असून कामकाज कालावधीनंतर त्यांना त्यांच्या जीवाची शाश्वती राहिली नाही . त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, शासकीय कामकाजात लोकप्रतिनिधीच अडथळा आणू लागले तर आम्ही दाद कोणाकडे मागायची ? असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे . सोमवारी दि16 रोजी सातारा पालिकेची सभा होत आहे . त्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे .
प्रभागातील वारंवार समस्या सांगूनही आरोग्याचे कर्मचारी व मुख्यअधिकारी शंकर गोरे माझ्या समस्यांकडे टाळाटाळ करत असल्याने मी लोकशाही मार्गाने आंदोलन केले आहे ज्या नागरी सुविधा मिळाव्यात त्या मिळत नसल्याने मी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे सातारा चे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लक्ष घालून मुख्याधिकारी शंकर गोरे यांची तात्काळ बदली करावी ही मागणीही नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी यावेळी केली