शिवसेना काढली तेव्हा महाराजांच्या वंशजांना विचारण्यास आले होते का? शिवाजी महाराजांचा सोईप्रमाणे वापर करायचा, असे यांचे काम आहे. शिवाजी महाराजांचे नाव काढून ठाकरे सेना करा, बघा कितीजण पक्षात उरतील. महाशिवआघाडीतून शिव हा शब्द का काढून टाकला याचे उत्तर द्यावे, असे माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
जाणता राजा ही उपमा आजकाल काहींना दिली जाते. पण, जाणता राजा हे फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच होते. दुसरे कोणीही होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाल्याने वाईट वाटते, अशी भावनाही उदयनराजेंनी व्यक्त केली.
उदयनराजे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. जगात आदर्श असलेल्या शिवाजी महाराजांशी अनेकदा वेगवेगळ्या व्यक्तींसोबत तुलना केली जाते. बुद्धी गहाण ठेवली आहे का, असे मला वाटते. जे पुस्तक प्रकाशित झाले त्याबद्दल वाईट वाटते. कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणार नाही. जाणता राजा सध्या अनेक जणांना उपमा दिली जाते. पण, माझ्यामते फक्त छ शिवाजी महाराजच जाणता राजा आहेत. शिवाजी महाराज युगपुरुष होते, ते कधीतरी जन्मतात. छ.शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून मी कधी मिरवले नाही. मी माझे सौभाग्य समजतो. मागच्या जन्मात पुण्य केल्यानेच मला हे भाग्य लाभले. शिवाजी महाराजांचे गुण अंगाकरणाचा प्रयत्न करा, थेट महाराज बनू नका. छ.शिवाजी महाराजांनी कधीही मतभेद केले नाहीत.