सातारा पालिकेच्या घंटागाडया रस्त्यावर येण्यापूर्वीच वादाची घंटा वाजवू लागल्या आहेत . गेल्या सहा महिन्यापासून एमआयडीसीतील गोडाऊनमधील गाडयांच्या पत्र्याला गंज चढायला सुरवात झाली आहे . मात्र घंटागाडी सेवा त रूजू होण्याआधीच आरोग्य विभागाच्या गुडगुडीबाबाने लक्ष्मी दर्शनाची जोरदार घंटा वाजवल्याचा खळबळजनक किस्सा समोर आला आहे .
हे लक्ष्मी दर्शन हस्ते परहस्ते बेअरर चेकने झाले असून या लाभाच्या कोटयात आरोग्य विभागाशी संलग्नित नेहमीचे सरावाचे खेळाडू वगळण्यात आल्याने नक्की आरोग्य सातारकरांचे सुधारतेय की खाऊ बाबाचे या प्रश्नाला सध्या तरी उत्तर नाही .
आरोग्य विभाग म्हणजे लाभ केंद्राची होलसेल फॅक्टरी बनला आहे . स्वच्छता कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारांची मुदत संपल्यानंतरही त्यांचा कोणताही ठराव न घेता अथवा ई टेंडरिंग न करता सतरा लाखाची स्वच्छता बिले बिनधास्त ओरपून ढेकर देण्याचे प्रकरण ताजे असताना सातारा पालिकेच्या नवीन घंटागाडयातही खाऊ बाबाचे हात जोरदार ओले झाले असल्याची नवीन माहिती समोर आली आहे . चार ठेकेदारांच्या घंटागाडयांच्या स्वच्छतेचे टेंडर येत्या बावीस फेब्रुवारी रोजी संपत आहे . आता पालिकेच्या मालकीच्या घंटागाडया साताऱ्याचा कचरा उचलणार असून वार्षिक दर मंजूरीची फाईल स्थायी समितीच्या प्रतिक्षेत आहे . घंटागाडयांची खरेदी 26 जून रोजी झाली व दोन महिन्यात सांगली येथून गाड्या बांधून सातारा एमआयडीसीच्या गोडाऊनमध्ये दाखल झाल्या तब्बल सहा महिने गाड्या उभ्या च राहिल्याने गाड यांच्या बॅटऱ्या आणि त्याचे चार्जिंग कनेक्ट खराब झाले आहेत . पत्रा आणि कंटेनरच्या हायड्रॉलिक यंत्रणेला गंज चढू लागल्याने गाडया प्रत्यक्षात वापरात येण्यापूर्वी निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे .. आता डीलरला एवढी मोठी ऑर्डर मिळाल्याच्या मोबदल्यात आरोग्य विभागाच्या गुडगुडी बाबाला पाच आकडी रकमेची मोठी बिदागी मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे .
तत्कालीन सभापती व गुडगुडी बाबांनी गाडी खरेदीनंतरच कमिशनसाठी जोरदार फिल्डिंग लावली होती मात्र प्रत्यक्षात दोन वेळा वार्षिक दर व टेंडर रिकॉल करण्याची वेळ आल्याने जमत आलेला सारा मामला फिसकटला .आरोग्य विभागातल्या जुन्या खोगीर भरतीला सातव्या वेतन आयोगाचा पगार चण्या फुटाण्यासाठी असतो . गुडगुडी बाबासह इतर महाभागांचे काही खेळ डोळे पांढरे करायला लावणारे आहेत . या विभागात कमिशनराज फोफावल्याने येथे काम कमी टक्केवारीचीच भाषा चालते . मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांच्यासमोर मात्र आरोग्य विभाग साळसूदपणाचा आव आणतो मात्र लाभाचा निधी कुठे आणि किती जिरला याची पाळेमुळे खणण्यासाठी काही सातारकरांनी जिल्हाधिकाऱ्यांची दारे ठोठावली आहेत . घंटागाडीची घंटा आणि आरोग्य विभागात लक्ष्मी दर्शनाचा तंटा याची चर्चा आहे . गुडगुडी बाबाने हस्ते परहस्ते मालिदा पदरात पाडला मात्र प्रशासन अंधारात राहिले याची पालिकेत चर्चा सुरू झाली आहे .
चौकट- धुमाळ साहेब इकडेही लक्ष दया .
सातारकरांच्या आरोग्य सेवेसाठी असणारे चार निरीक्षक लक्ष्मीचे सेवक झाल्याचे अंतरंगी किस्से अनेक आहेत . टेंडरचा वेळ काढूपणा करणे, मस्टर मेंटेन करताना हजेरीचा घोळ घालणे, पंधरा दिवसाच्या गैरहजर कर्मचाऱ्याचा पगार काढणे असे अनेक किस्से सातारानामा चया रडारवर आहेत . सातारकरांची सेवा करा अन्यथा आरोग्यच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाडू असा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला आहे . त्यामुळे या गंभीर प्रकरणाकडे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी लक्ष देण्याची मागणी सातारकरांनी केली आहे .