पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली 12 जणांवर कारवाई

91
Adv

मास्कचा वापर न करणाऱ्या व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातारा नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून बारा जणांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी पहाटे पाच वाजता या मोहिमेस सुरुवात करून सात हजार रुपयांचा दंड वसूल केला.

सातारा शहरात करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी नागरिकांकडून प्रशासनाला म्हणावे असे सहकार्य मिळत नाही, असे दिसून येत आहे. वारंवार सूचना करूनही नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नाही. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. दुकानदारांकडूनही सोशल डिस्टिंनंसगचे नियम पाळले जात नाहीत.

असे अनेक प्रकार सातत्याने घडत असल्याने प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी शुक्रवारी पहाटे पाच वाजता कर्मचाऱ्यांसह कारवाईस प्रारंभ केला.

बाजार समिती, मार्केट यार्ड, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मास्क न वापरणाऱ्या दहा नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपये तर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानदारांकडून प्रत्येकी एक हजार रुपये असा सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नागरिकांना शिस्त लागावी हा या कारवाई मागचा उद्देश आहे; परंतु कारवाई करूनही नागरिक व दुकानदारांच्या वर्तणुकीत कोणताही बदल होताना दिसत नाही. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेला पुन्हा एकदा कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

Adv