राज्यातील बहुतांश जिल्ह्यात प्राथमिक स्तरावर आज शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या थाळी मुळे गरिबांची भूक भागणार असून बचत गटांना रोजगारही मिळणार आहे. शिवभोजन योजना ही राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात पोटभर जेवण देणारी सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. त्यानंतर, 10 रुपयातील थाळीचा आस्वादही त्यांनी घेतला. मात्र, आव्हाड यांच्यासोबत 10 रुपयांच्या थाळीसोबत 10 ते 15 रुपयांची पाण्याची बाटली असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. 10 रुपयांच्या थाळीसोबत पाण्याची बाटलीही मिळणार का? असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत. विशेष, म्हणजे 10 रुपयांच्या थाळीसोबत 10 ते 15 रुपयांची पाणीबॉटल असल्याने गरिबांनाही थाळीसोबतच पाणी बॉटल मिळणार का, असे म्हणत आव्हाड यांचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे. आव्हाड यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरही नेटीझन्सने टीकात्मक प्रश्न विचारले आहेत.