शेंद्रे गटात एकही समस्या शिल्लक राहणार नाही शिवेंद्रसिंहराजे; मतदारसंघात भाजपचा झंझावाती प्रचार दौरा

151
Adv

सातारा- जावळी मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा झंझावाती प्रचार सुरु असून जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे जिल्हा परिषद गटातील कुसवडे,भाटमरळी,शेळकेवाडी,उपळी,शहापूर, साठेवाडी, जकातवाडी, डबेवाडी, सांबरवाडी, येवतेश्वर आदी परिसरात शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रचार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शेंद्रे गटातून शिवेंद्रसिंहराजे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.
भाटमरळी येथे झालेल्या प्रचार सभेत शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारांशी संवाद साधला. भाजपाची प्रतिमा ही स्वच्छ असून त्यांनी देशात व राज्यात अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत.तसेच देशाची अखंडता ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींनी 370 कलम हटवून धाडसी, ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे साऱ्या देशातून कौतुक होत असून भारतीयांना त्याचा अभिमान आहे. साताऱ्यात मेगा प्रोजेक्ट आणून औद्योगिकरणास चालना दिली जाईल. यामुळे युवकांना रोजगार उपलब्ध होतील. तसेच स्थानिक विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मेडिकल कॉलेज लवकर सुरु करणार आहे. या विभागातील लांब पल्ल्याचे असलेले रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून लवकरच मार्गी लावणार आहे. मतदारसंघाच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून मी भाजपमध्ये राहणे योग्य समजले आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीचा विचार करून आपण लोकांच्या हितासाठी धोरण बदलले आहे. भाजपच्या माध्यमातून उर्वरित कामे लवकरच मार्गी लावून, आगामी काळात शेंद्रे गटात एकही समस्या अथवा प्रश्न शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे, बाजार समितीचे सभापती अॅड. विक्रम पवार, संचालक दत्तात्रय शिंदे, सयाजी चव्हाण, सरपंच सौ.कविता देशमुख, केतन चव्हाण, हिंदुराव जाधव, खरेदी विक्री संघाचे संचालक सुशांत माने, नामदेव माने, अमर मोरे, अशोक पाटील, मोहन साळुंखे, संदीप पवार, संतोष शेळके, सुभाष पवार आदी मान्यवरांसह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अरविंद चव्हाण म्हणाले, शेंद्रे गटाचे वातावरण भाजपमय झाल्याने कार्यकर्त्यांच्या विकासाचे स्वप्न बाबाराजेंच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रचारामध्ये कार्यकर्त्यांबरोबर युवाशक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने विरोधी गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवेंद्रराजे सर्वसामान्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्याचा जातीनिशी प्रयत्न करत असून त्यांना लोकांबद्दल तळमळ आहे. सतत लोकांच्या संपर्कात राहून विकासाला प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे.
भाजप उमेदवार श्री. छ.उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साताऱ्यात येत आहेत.पंतप्रधान हे पहिल्यांदाच साताऱ्यात येत असून, त्यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ना.नरेंद्र मोदींनी देशाची प्रतिमा उंचावून जगात नाव कमविले आहे. त्यांचे सातारकरांसाठी असलेले विचार ऐकण्यासाठी लोक आतुरलेले आहेत. सदर सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड.विक्रम पवार यांनी यावेळी केले.

Adv