45- सातारा लोकसभा पेाटनिवडणुकीचे खर्च पडताळणी निरीक्षक राकेश भदोदीया यांनी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या कक्षाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
लोकसभा पोटनिवडणूक निवडणूक खर्च निरीक्षक श्री. भदोदीया यांनी सर्वप्रथम संशयित पेड न्यूज बाबत कशा पद्धतीने समितीचे कामकाज चालते याची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी दैनंदिन अहवाल तपासले त्यानंतर समितीमार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमावरील जाहिरातीवर कशापद्धतीने नियंत्रण ठेवले जाते त्याची माहिती घेतली.
तसेच जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रात येणाऱ्या उमेदवारांच्या जाहिरातीचे शासकीय दराप्रमाणे किती रक्कम होते, त्याची माहिती संबंधित खर्च समितीकडे पाठविण्यात येते का, त्याबाबतच्या अहवालाची पाहणीही खर्च निरीक्षक श्री. भदोदीया यांनी केली.
यावेळी समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सोशल मीडिया तज्ञ तथा कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी खर्च निरीक्षकांना समितीमार्फत कशा पद्धतीने कामकाज केले जाते याची सविस्तर माहिती देऊन समितीची रचना व समितीमार्फत करण्यात येत असलेल्या माध्यम प्रमाणीकरण व इतर कामकाजाची माहिती तसेच उमेदवारांच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण कशा पद्धतीने केले जाते या विषयीची माहिती सांगितली.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने सातारा जिल्ह्याची पूर्वपीठिका श्री. भदोदीया यांना देण्यात आली. यावेळी श्री. भदोदीया यांनी माध्यमकक्षाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.