भाषा म्हणजे संवाद. संवाद हा वेगवेगळया पध्दतीने होऊ शकतो. आपण जे बोलतो ते दुस-याला कळणे हे भाषेचे उद्दिष्ट. मराठी भाषा केवळ अनिवार्य करुन उपयोग नाही तर ती व्यावहारिक होण्यासाठी अधिक प्रयत्न गरजेचे आहे. त्यासाठी तिची लिपी, साहित्य, व्यावहारिक महत्व निर्माण झाल्यास मराठी भाषा अधिक वृध्दींगत होईल असे मत प्रसिध्द लेखक व प्रकाशक रामदास भटकळ यांनी व्यक्त केले.
येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये मसाप, शाहुपुरी शाखा आयोजित राज्यातील पहिल्या मराठी पंधरवडयाच्या आठव्या वर्षाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर मसाप, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, नगरसेवक अविनाश कदम, किशोर बेडकिहाळ आणि मान्यवर उपस्थित होते.
श्री. भटकळ पुढे म्हणाले, भाषेबद्दल प्रेम बाळगले पाहिजे. कोणतेही भाषा इतर भाषांवर अत्याचार करत नाही तर ती वृध्दींगत करुन नवा आयाम देऊ शकते. इतर भाषेतील शब्द स्वीकारणे हेही महत्वाचे. भाषा समाज निर्माण करतो, स्वीकारतो. भाषा शुध्दीपेक्षा भाषा वृध्दी महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मराठी भाषा कशी समृध्द झाली याबाबत सांगितले. प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे असा महात्मा गांधीचा आग्रह होता. एक भाषा चांगली आली तर दुसरी भाषा शिकण्यास सोपी जाते. सर्वधर्मसमभाव प्रमाणे सर्व भाषा समभाव ही संकल्पना महात्मा गांधींनी मांडली होती. मराठीला महत्वाचे स्थान द्यायचे असेल तर व्यापक विचार केला पाहिजे. त्याची लिपी, साहित्य, व्यावहारिक उपयोग वाढवला पाहिजे. मराठी केवळ अनिवार्य करुन उपयोग नाही तर व्यावहारिक उपयोग वाढवण्यासाठी शिक्षण दिले पाहिजे, साधने निर्माण केली पाहिजेत. इतर भाषांमध्ये जशी विविध विषयांवर विपुल पुस्तके, शब्दकोश आहेत तशी मराठीत निर्माण झाली पाहिजेत. लहानवयांपासून केवळ मराठीचा आग्रह धरुन उपयोग नाही तर त्यांना आवश्यक असणारी पुस्तकनिर्मिती, साधने निर्माण झाली पाहिजेत. साहित्यनिर्मिती ही बोलीभाषेतच झाली पाहिजे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मसाप, शाहुपुरी शाखेच्या उपक्रमाचे कौतुक करत साता-याबरोबर असलेले ॠणानुबंध त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन मराठी भाषा पंधरवडयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर संयोजकांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी मसाप, शाहुपुरी शाखेचे उपक्रम सांगत सर्वांच्या सहकार्याने गेली आठ वर्षे हा उपक्रम सुरु असल्याचे सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. महाराष्ट्र शासनानेही जानेवारीत मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यापेक्षा तो 27 फेब्रुवारीपासून केला पाहिजे असे मत व्यक्त केले.