वेबेक्स ऑनलाईन प्रणालीचा घोळ निस्तरत सातारा पालिकेच्या स्थायी समितीने 114 विषयांना शुक्रवारी मंजूरी दिली . शाहू कला मंदिराच्या नूतनीकरणासह अनेक विषय केवळ ठेकेदारांसाठी अजेंड्यावर घेण्यात आल्याची चर्चा होती . नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ऑन लाईन प्रणालीचे दोष दिसून आले .
18 फेब्रुवारी नंतर तब्बल साडेसहा महिन्यांनी झालेल्या स्थायी समितीच्या सभेची पालिकेत चर्चा होती . नगराध्यक्ष माधवी कदम, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पालिकेच्या शिवाजी सभागृहातूनच सभेला उपस्थिती दर्शविली . विषय समितीच्या सभापतींनी दूरस्थ पध्दतीने सभेस उपस्थिती दर्शविली . वेबेक्सच्या इको साउंड चा त्रास जाणवला नाही . मात्र नेटवर्कच्या सतत येण्याजाण्याने पटलावरची प्रतिमा गायब होणे, आवाजाची तीव्रता कमी होणे किंवा चर्चेच्या वेळी आवाजाचे लॅगिंग होणे या तांत्रिक अडचणी नी आजच्या सभेतही डोके वर काढले . मात्र तरीही पालिकेच्या तंत्र विभागाने आज बाजू सावरली किमान सभागृहातील विषय वाचन सदस्यापर्यंत पोहचेल याची व्यवस्था यथोचित करण्यात आली . सभापती विशिष्ट अंतरावरून व्हिडिओ मीट मध्ये सामील झाल्याने इको साउंड चा त्रास जाणवला नाही . पण नेटवर्कच्या अडचणी मात्र सुरूच होत्या .
तब्बल दीड तास चाललेल्या सभेत सभा अधीक्षक रंजना भोसले यांनी एक ते दहा विषयांचे वाचन केले . मात्र नेटवर्कचा घोळ आणि विषय वाचनात जाणारा वेळ यामुळे सभातील विषय वाचनाची गाडी मंजूर मंजूर करत पळवण्यात आली . पेव्हर ब्लॉकचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला शाहू कला मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाला मंजूरी देण्यात आली . शहरातील बागा या ठेकेदारांना करार तत्वावर देण्यात आल्या आहेत तरीसुध्दा गवत कापण्यासाठी ग्रास कटिंग मशिनचा एक लाख सहासष्ट हजाराचा विषय मंजूर झाला . पाणीपुरवठा पंत्रणेचे सक्षमीकरण, घंटागाडयांना जीपीएस यंत्रणा बसवणे, पालिकेतील दूरध्वनी यंत्रणेसाठी ईपीबीएक्स ची खरेदी करणे यासह एकूण 114 विषयांना मंजूरी देण्यात आली . मात्र कोणत्याही विषयांची तपशीलवार मांडणी व चर्चा झाली नाही . ठेकेदारांच्या लांगुलचालनासाठी काही विषय अजेंडयावर आले होते त्यामध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता होती . मात्र प्रत्यक्षात मंजूर एक्सप्रेसच्या घाईमुळे चर्चेला वावच ठेवण्यात आला नाही .