विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये उमेदवार देताना सातारा जिल्ह्यावर कायमच अन्याय झालेला आहे. गेली अनेक दशके सातारा जिल्ह्याला या मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. आता या मतदारसंघासाठी साताऱ्यातील उमेदवार द्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष दिपाली गोडसे यांनी केलेली आहे.
सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली असे पाच जिल्हे विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये येतात. पदवीधर मतदारसंघासाठी सातारा जिल्ह्यातून ५६ हजार ४३४ इतकी मतदार नोंदणी झालेली आहे. मतदार नोंदणी सुरु असल्याने यात आणखी वाढ होणार आहे. सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना या मतदारसंघांमध्ये नेतृत्व करण्याची संधी अनेकदा मिळालेली आहे. विद्यमान केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघात काम करण्याची संधी मिळालेली आहे. ही संधी आता साताऱ्याला मिळाली पाहिजे, अशी मागणी सर्व शिक्षक संघटना व पदवीधर संघटना यांच्या वतीने गोडसे यांनी केलेले आहे.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणारी कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था साताऱ्यातील आहे. तरीदेखील शिक्षक मतदारसंघांमध्ये साताऱ्यातील उमेदवार देताना सर्व पक्ष अन्याय करत असल्याचे मत पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी उमेदवार सुधीर विसापूरे यांनी व्यक्त केले आहे.
अटकेपार झेंडा फडकावून मराठ्यांचे तक्त शाबूत ठेवणारी शिवछत्रपतींची थेट राजधानी सातारा जिल्हा आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ असो अथवा पुणे शिक्षक मतदार संघ या दोन्ही मतदारसंघाची निगडित प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी ऐतिहासिक राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये एका उमेदवारासाठी तिथली जागा सोडावी, अशी सर्व राजकीय पक्षांना विविध संघटनांची आग्रहाची मागणी आहे.
भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ शाखा महाराष्ट्र सिद्धेश्वर पुस्तके, कराडमधील पदवीधर संघटना तसेच मराठा मोर्चाच्या सदस्यांशी तसेच सातारा शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक या शिक्षकांशी चर्चा केली असून अनेक जणांनी सातारा जिल्ह्याला उमेदवारी मिळावी, असे नमूद केलेले आहे. पदवीधर लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सातारा जिल्ह्याला प्रतिनिधित्व करण्यास मिळावे. माजी मंत्री आमदार एन. डी. पाटील, सुरेश पाटील, गजेंद्र ऐनापुरे, भगवानराव साळुंखे, आ. दत्तात्रय सावंत या जिल्ह्याबाहेरील मंडळींना आत्तापर्यंत शिक्षक मतदारसंघातून आमदार होण्याची संधी मिळाली होती. आता सातारा जिल्ह्याला ही संधी द्यावी अशी ठाम मागणी आपण करत असल्याचेही दीपाली गोडसे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.