सातारा पालिकेत नवीन 11 नगरसेवकांची पडणार भर आमदार , खासदार व राष्ट्रवादीत लढतीची शक्‍यता

71
Adv

हद्दवाढीनंतर तीन ग्रामपंचायती बरखास्त होऊन त्या क्षेत्रातील साधारण 95 हजार लोकसंख्येची भर पालिकेच्या क्षेत्रात पडणार आहे. म्हणजेच नगरपालिकेच्या नव्या रचनेमध्ये 11 नगरसेवकपदांची निर्मिती झाली असून एकूण 51 नगरसेवक असणार आहेत.

साताऱ्याची हद्दवाढ जाहीर झाल्याने आता येथील राजकारण नव्या वळणावर जाण्याची चिन्हे आहेत. आगामी नगरपालिका निवडणूका डिसेंबर 2021 मध्ये होणार असून संबधित क्षेत्राचे प्रभाव गट राजकारणात काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. शाहूपुरी, दरे बुद्रुक, करंजे ग्रामीण, विलासपूर या भागांतून नवीन 11 नगरसेवकांची निवड करताना आमदार व खासदार गटातच राजकीय स्पर्धा होणार असल्याचे चित्र आहे. साताऱ्याच्या हदवाढीची गुड न्यूज आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी दिल्यानंतर जल्लोष करणारे नगरसेवक केवळ आमदार गटाचेच होते. खासदार गटाचे नगरसेवक जल्लोषात सहभागी दिसले नाहीत. मात्र, नगराध्यक्षांच्या व उपनगराध्यक्षांच्या स्वाक्षरीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात हद्दवाढीचा सर्वप्रथम पाठपुरावा खासदार उदयनराजे भोसले यांनी
केल्याचा दावा करण्यात आला.

दुसरी बाब म्हणजे आमदार व खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना सातारा तालुक्‍याची 201 गावे राष्ट्रवादीची “व्होट बॅंक’ होती. मात्र, शिवेंद्रराजे व उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाने सातारा तालुक्‍याचे राजकीय संदर्भ बदलले. यंदा वाढीव भागाची निवडणूक व पंधरा महिन्यांवर येऊ घातलेल्या सातारा पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे थेट लढतीचे चित्र पहायला मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र, या लढतीसाठी भाजपच्या तंबूतील आमदार शिवेंद्रसिंहराजे व खासदार उदयनराजे भोसले यांचा राजकीय एकजिनसीपणा महत्वाचा ठरणार आहे. 11 नगरसेवकांच्या रस्सीखेच स्पर्धेचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे. दोन्ही नेत्यांच्या विरोधातील नाराज गटांना राष्ट्रवादीची ताकद मिळू शकते.

खेड ग्रामपंचायतीचा साधारण 20 टक्के भाग हद्दीत आल्याने आमदार शशिकांत शिंदे यांचा गट सक्रिय झाला आहे. कोरेगाव विधानसभा निवडणुकीत खेड ग्रामपंचायतीने साथ नाकारल्याची सल शशिकांत शिंदे यांच्या मनात अजूनही आहे. त्यामुळे नाराज गटाची मोट बांधून राष्ट्रवादी जर निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर आश्‍चर्य वाटायला नको. हद्दवाढीनंतर नवीन भागांची निवडणूक येत्या सहा महिन्याच्या आत घ्यावी लागणार आहे. हा कालावधी मार्च 2021 चा पर्यंतचा आहे. त्यातही पुन्हा करोनाच्या स्थितीचा प्रश्‍नही येण्याची शक्‍यता आहे. या व डिसेंबर 2021 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता साताऱ्याचे राजकारण नव्या वळणावर रंगतदार अवस्थेत असणार आहे.

पायाभूत सुविधांचे आव्हान मोठे…
हद्दवाढीमध्ये 19 टक्के त्रिशंकू भाग हद्दीत आला आहे. गोडोली, जगतापवाडी, चार भिंती लगतची कोल्हाटी वस्ती, मंगळाईदेवी पायथ्याच्या नागरी वसाहतीतील 21 सोसायट्या, बोगदा परिसर, पॉवर हाऊस झोपडपट्टी तसेच शाहूपुरी व खेड ग्रामपंचायतीचा महामार्गाच्या पश्‍चिमेचा भाग येथील पायाभूत सुविधांच्या विकासाचे आव्हान आता पेलावे लागणार आहे. शाहुपुरी ग्रामपंचायतीचा बराच भाग कृष्णा उदभवाच्या पाणीपुरवठ्यावर अंवलंबून आहे. हद्दवाढीनंतर आधीच मंजूर असलेल्या पण खोळंबून पडलेल्या कण्हेर योजनेच्या कामाला गती मिळण्याची शक्‍यता आहे.

शहराचा परीघ आता 24 किलोमीटरच्या क्षेत्रात विस्तारल्याने सातारा पालिकेला कचरा डेपोची समस्या भविष्यात भेडसावणार आहे. पावणेसात एकरातील सोनगाव कचरा डेपोची क्षमता संपली आहे. त्यामुळे शहरासाठी नवीन कचरा डेपोसाठी जागा शोधणे व जादा घंटागाड्यांचे नियोजन करावे लागणार आहे. हद्दीत समाविष्ट झाल्याने अस्तित्व गमावलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवा पालिकेकडे वर्ग करणे, तेथील रेकॉर्ड व इमारती ताब्यात घेणे, त्यांच्या आस्थापना तयार करणे या मूलभूत गोष्टी नगरपरिषद संचालनालयाला कराव्या लागणार आहेत. सध्या पालिकेची केसरकर पेठेतील इमारतीची जागा कमी पडण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाला कॅंप सदरबझार येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती द्यावी लागणार आहे.

Adv