सातारा शहरालगतच्या माजगावकर माळ येथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 1910 घरकुले उभे करण्याचे प्रस्तावित आहे . या कामाचा भाग म्हणून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी गुरुवारी या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली . यावेळी आरोग्य विभाग प्रमुख सुहास पवार , व सातारा विकास आघाडीचे ज्येष्ठ सदस्य अशोकदादा घोरपडे उपस्थित होते .
सुमारे 190 कोटी रुपयांच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 1910 पकक्या सदनिका बांधण्याचे नियोजन आहे . ही जागा सुमारे दोन एकर असून या जागेचे सपाटीकरण व इतर सुविधांचे विकसन प्रगती पथावर आहे . या योजनेतील पात्र लाभार्थी यादी लवकरच अंतिम केली जाणार असल्याने प्रत्यक्ष कामाला आता वेग येण्याची शक्यता बळावली आहे . या कामाचा आढावा घेण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी या प्रस्तावित जागेला भेट देऊन कामाची प्रत्यक्ष माहिती घेतली . यातील प्रस्तावित काही विषयांचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने अंतिम करण्यात येणार असल्याचे मनोज शेंडे यांनी सांगितले . विशिष्ट व्याज दरावर या घरांना साधारण दहा लाखापर्यंत चे कर्ज दिले जाणार असून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया बांधकाम विभागात सुरु आहे . येत्या ३ जानेवारी पासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याचे संकेत यावेळी उपनगराध्यक्षांनी दिले . माजगावकर माळाच्या परिसरात बेवारस मृतदेह दफन करण्यासाठी काही जागा राखीव आहे . या जागेचे हस्तांतरण इतरत्र करता येणे शक्य आहे का ? याची चाचपणी सुरु असल्याचे शेंडे यांनी सातारानामाशी बोलताना स्पष्ट केले .