कोरोना संसर्गाबाबत अनेक अफवा समाज माध्यमांवरुन पसरत आहे, अशा अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन आवाहन आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी, त्यांनी हे आवाहन केले आहे. यात्रा, जत्रा तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या निर्णयाला नागरिकांनी सकारात्मक दृष्टीने पहावे. जत्रा, यात्रांमधील धार्मिक पुजा ही पुजारी किंवा मानकरी यांनी करुन घ्यावी.
या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी खासगी डॉक्टरांनीही योगदान द्यावे, असे आवाहन करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी सबंधित शिक्षकांना सुट्टी नसल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागांसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी 50 घरांना एक पथक तर शहरी भागातील 100 घरांना एक पथक निर्माण करण्यात आले आहे. कोरोना संसर्गा विषयी अनेक अफवा, मजकुर व्हॉटस्ॲपवर व्हायरल होत आहे या मजकुरांची सत्यता पडताळा. दुर्दैवाने कोरोना संसर्ग रुग्ण आढळला तर त्याला जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
तत्पुर्वी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडून जिल्ह्यातील एकूण परिस्थतीचा आढावा घेतला. पुढील उपययोजनांसाठी सूचना केल्या.
0000
Home Satara District अफवांवर विश्वास ठेवू नका, कोरोना संसर्गावर मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज – पालकमंत्री...